रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील रिक्षा थांबे ७ महिन्यांनंतरही बंदच

डोंबिवली : करोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील रिक्षा थांबे मध्य रेल्वे प्रशासनाने गेल्या सात महिन्यांपासून बंद ठेवले आहेत. एरवी या थांब्यावर थांबणाऱ्या जवळपास दोन ते तीन हजार रिक्षा आता स्थानक परिसरातील रस्त्यांवर बेशिस्त उभ्या केल्या जात आहेत. यामुळे या परिसरात सकाळ आणि सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

कल्याण रेल्वे स्थानक परिसर एरवीही वाहन कोंडीपासून मुक्त नसायचा. गेल्या काही दिवसांपासून मात्र ही कोंडी आणखी वाढू लागली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास बंद करण्यात आला होता. या काळात रेल्वे स्थानक परिसरात सर्व सामान्यांनी प्रवेश करू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकांच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. कल्याण रेल्वे स्थानकाच्या हद्दीत १० ते १२ रिक्षा थांबे आहेत. या थांब्यामध्ये कल्याण शहर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, शहाड, अंबिवली आणि टिटवाळा या परिसरांत जाणाऱ्या सुमारे दोन ते तीन हजार रिक्षा उभ्या राहतात. मात्र स्थानक परिसरातील रिक्षा थांबे रेल्वेच्या हद्दीत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून थांब्यातील प्रवेशही बंद केला. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून या थाब्यांवर उभ्या राहणाऱ्या रिक्षा आता स्थानकाबाहरेच उभ्या राहात आहेत.

काही महिन्यांपूर्वी टाळेबंदी सुरू असल्यामुळे रिक्षांची संख्या कमी होती. सध्या टाळेबंदी मोठय़ा प्रमाणात शिथिल झाल्याने स्थानक परिसरातील रिक्षांची संख्या बंद आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील या थांब्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षांचा भार शेजारील रस्त्यावर पडू लागला असून या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

रिक्षा थांबे सुरू करणे अशक्य

सध्याची करोनाची परिस्थिती पाहता नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील रिक्षा थांबे सुरू केल्यास नारिकांची थेट रेल्वे फलांटावर गर्दी होण्याची शक्यता असून सर्वसामान्य नागरिकही विनातपासणी सहज प्रवेश करू शकतील. त्यामुळे सध्यातरी हे रिक्षा थांबे सुरू करणे शक्य नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.