X

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग उद्यापासून खुला

पुलाच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

पुलाच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

गेल्या चार महिन्यांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या मुख्य शहरांतील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेला मुंब्रा बाह्य़ वळण मार्ग वाहतुकीसाठी येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेली मुदत पाळली जावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस या रस्त्याचे काम सुरू आहे. संपूर्ण सहा किमी लांबीच्या रस्त्यापैकी ६०० मीटर पुलाच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता दिलेल्या मुदतीत १० सप्टेंबरपासून वाहनांसाठी खुला केला जाईल, असा दावा बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पुलाच्या खालच्या बाजूस असलेल्या रस्त्याचे बांधकाम १० सप्टेंबरनंतरही सुरू राहील. मात्र यामुळे वाहन प्रवासाला अडथळा निर्माण होणार नाही, असेही पुलाच्या बांधकाम अभियंत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बाह्य़ वळण मार्गावरून सुरू असते. या मार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याची बाब पुढे येताच मे महिन्याच्या अखेरीस येथील कामास सुरुवात करण्यात आली. या कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले होते. या मुदतीनुसार १६ जुलैला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता होती. तीन महिने उलटले तरी हे काम सुरूच आहे. याच दरम्यान येथील पुलाकडील भागही खचल्याने हे काम लांबले होते. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग असणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरून पुढे नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने सोडली जात असल्याने गेल्या काही महिन्यांपासून महामुंबईत अभूतपूर्व अशी कोंडी होत आहे. ही कोंडी लक्षात घेता शासनाने मुंब्रा बाह्य़ वळण मार्गाचे काम १० सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून कोणत्याही परिस्थितीत १० सप्टेंबरची मुदत पाळली जाईल, असे येथील बांधकाम व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात जोरदार पावसामुळे या मार्गावर तडे गेल्याची बाब घडली. दरम्यान, संपूर्ण रस्त्याची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून दुरुस्ती करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला. पुन्हा कामाला सुरुवात झाली, मात्र काम पुन्हा लांबणीवर पडून कामास विलंब झाला. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ऑगस्टचा ही मुहूर्त टळून आता येत्या सोमवारपासून म्हणजेच १० सप्टेंबरला मुंब्रा बाह्य़ वळण मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा बाह्य़ वळण मार्ग दुरुस्तीच्या कामाचे व्यवस्थापक प्रेमसिंग यांनी दिली. सध्या बाह्य़ वळण मार्गावरील पुलावरील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. दोन दिवस पुलावरील डांबरीकरणाचे काम सुरू राहील, असे अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे.

पुलाच्या दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

मुंब्रा बाह्य़ वळण मार्ग हा सहा किलोमीटर अंतराचा आहे. यापैकी पुलाचा भाग ६०० मीटर आहे. या पुलावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडून पुलाची मोठी दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात पुलावर साचणारे पाणी हे पुलाच्या खालील भागात झिरपत असते. यावर उपाययोजना म्हणून दुरुस्तीच्या काळात ‘वॉटर प्रूफ मेमब्रेन्स’ हे तंत्रज्ञान वापरून पुलावर डांबरीकरण करण्यात आले आहे. जेणेकरून पुलावर साचणारे पाणी हे पुलाखालून न झिरपता पुलावरील विसर्ग वाहिन्यांतून बाहेर टाकले जाईल.

१० सप्टेंबरनंतर मुंब्रा बाह्य़ वळण मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाला तरी पुलाखालचे डागडुजीचे बांधकाम तसेच सुरू राहणार आहे. याचा परिणाम पुलावरून जाणाऱ्या वाहतुकीवर होणार नाही. – प्रेमसिंग, दुरुस्ती कामाचे व्यवस्थापक