विरोधामुळे पाचपाखाडीतील बदल अंशत: मागे

मूळ ठाणे शहरातील नौपाडा आणि पाचपाखाडी परिसरातील वाहतुकीत सुसूत्रता यावी यासाठी वाहतूक पोलिसांनी शनिवारी सकाळपासून या भागात अमलात आणलेले बदल ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आल्याचे चित्र दिसून आले. एलबीएस रस्त्यावरून मूळ शहरातील आराधना चित्रपटगृहामार्गे महापालिकेच्या दिशेने जाणारा उजव्या बाजूचा वळण रस्ता पोलिसांनी दुभाजकाजवळ बंद केला. त्यामुळे वाहनचालकांना हरीनिवास चौकातून वळसा घालून मार्गक्रमण करावे लागले. तसेच महापालिकेच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनांना हरिनिवास चौकात जाताना मालवण हॉटेलच्या दिशेचा एकमेव चिंचोळा रस्ता खुला होता. या बदलांविषयी स्थानिक रहिवाशी तसेच समाजमाध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्याने पोलिसांनी सोमवारपासून हा बदल मागे घेत अंशत: स्वरूपात तो सुरू राहील अशी सावध भूमिका घेतली आहे.

मूळ ठाणे शहरातील मुख्य अंतर्गत मार्गावर दररोज होणारी वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी नौपाडा तसेच पाचपाखाडी भागात काही वाहतूक बदलांचे प्रयोग हाती घेतले आहेत. गेल्याच आठवडय़ात स्थानक परिसरातील गोखले मार्गावरून तीन हात नाक्याच्या दिशेने जाणारा मार्ग कायमस्वरूपी एकेरी करण्यात आला. असाच एक प्रयोग करताना एलबीएस मार्गावरून आराधनाच्या दिशेने जाणारा उजव्या बाजूचा वळण रस्ता सिमेंटचे दुभाजक रोवून शनिवारी बंद करण्यात आला. त्यामुळे तीन पेट्रोल पंप एलबीएसवरून येणाऱ्या वाहनांना हरीनिवास चौकातून वळसा घालून आराधना मार्गावर यावे लागले. तसेच महापालिका ओपन हाऊ सवरून येणाऱ्या वाहनांना आराधना मार्गावर बंदी घालण्यात आली. या वाहनांना मालवण हॉटेल भागातून मीनाताई ठाकरे मार्गावरून हरीनिवासच्या दिशेने जावे लागत आहे. या वाहतूक बदलामुळे हरीनिवास भागात मोठी वाहतूक कोंडी होऊ लागताच स्थानिक रहिवाशी तसेच प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. आधीपेक्षा नियोजित स्थळी पोहचण्यासाठी पाच ते सात मिनिटे अधिक लागत असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात आले. या वाहतूक बदलाचा विरोध दर्शवणाऱ्या विविध प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटू लागल्या. वाहतूक बदल मागे घेण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून नौपाडा वाहतूक विभागाला तोंडी आवाहन करण्यात आले. अखेर सोमवारी या वाहतूक बदलाचा फेरविचार करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

काय असू शकतात नवे बदल?

ज्या ठिकाणी सिमेंटचे दुभाजक बसवण्यात आले होते ते काढण्यात येऊन त्याऐवजी तात्पुरते फायबरचे दुभाजक बसवण्यात येतील. सकाळी आणि सायंकाळी तीन तास  दुभाजक लावून पूर्वीचा वाहतूक बदल करण्यात येईल. उर्वरित वेळेत हा मार्ग खुला राहील.

नागरिकांच्या या वाहतूक बदलाला सहमत नसल्याच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्यामुळे हा बदल काही अंशी मागे घेण्यात येत आहे. सोमवारी नवा बदल जाहीर करण्यात येईल.    – दिगंबर भदाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा वाहतूक शाखा