|| नीलेश पानमंद

परिवहनच्या बसने प्रवास करणाऱ्यांना तिकिटाचा परतावा; ठाणे वाहतूक पोलिसांची व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून योजना

दिवाळीच्या काळात ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या ठाण्यातील गोखले रोड आणि राम मारुती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अभिनव योजना आखली आहे. दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या खासगी वाहनांमुळे होणारी गर्दी कमी करण्यासाठी या ग्राहकांनी ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) बससेवेतून प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच ज्या दुकानांतून ग्राहक खरेदी करतील, त्या दुकानात बसचे तिकीट दाखवल्यास त्यांना तिकिटाच्या रकमेचा परतावा देण्याचा प्रस्ताव पोलिसांनी आखला आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून ही योजना राबवण्याचे संकेत मिळत आहेत.

ठाणे शहरातील राम मारुती मार्ग आणि गोखले रस्ता हे महत्त्वाचे मार्ग आहेत. सदैव गजबजलेल्या या दोन्ही रस्त्यांलगत मोठी बाजारपेठ आहेत. त्यामुळे दिवाळीच्या दहा दिवस आधीपासूनच या रस्त्यांवर खरेदीसाठी ग्राहकांची       झुंबड उडते. त्यातच खरेदीसाठी येणाऱ्यांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी होते आणि त्याचा परिणाम संपूर्ण शहरातील अंतर्गत वाहतुकीवर दिसून येतो. दरवर्षी या कारणामुळे दिवाळीच्या दिवसांत ठाणे स्थानक परिसर कोंडीग्रस्त होतो.

हा अनुभव लक्षात घेऊन वाहतूक पोलीस यंदा काही उपाययोजना राबवणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना खासगी वाहनांऐवजी ‘टीएमटी’च्या बससेवेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा पोलिसांचा विचार आहे. ग्राहकांनी बसचे तिकीट दाखविल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून तिकिटाची रक्कम खरेदीच्या रकमेतून वजा केली जाईल, अशी ही योजना आहे. या संबंधीचा प्रस्ताव ठाणे वाहतूक पोलिसांनी टीएमटी अधिकाऱ्यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत दिला आहे. तसेच या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही मार्गावरील व्यापाऱ्यासोबत चर्चाही सुरू केली आहे. या संदर्भात टीएमटीचे व्यवस्थापक संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ठाणे वाहतूक पोलिसांनी अशाप्रकारचा प्रस्ताव दिला असल्याचे स्पष्ट केले. तसेच आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राम मारुती आणि गोखले मार्गावरील दुकानांमध्ये दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वत:च्या वाहनाऐवजी टीएमटीने प्रवास केला तर येथील वाहतूक कोंडी तसेच पार्किंगची समस्या सुटू शकेल. त्यामुळे घोडबंदर, पोखरण तसेच अन्य भागांतून राम मारुती आणि गोखले मार्गापर्यंत टीएमटीच्या विशेष बसगाडय़ा सुरू करण्याची योजना आखली आहे.    अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे (वाहतूक)

योजना अशी..

  • टीएमटीच्या बसगाडय़ांची सुभाष पथ आणि गोखले रोड मार्गे स्थानकाच्या दिशेने वाहतूक सुरू असते. राम मारुती रोड मार्गावरून बसची वाहतूक होत नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गावर दिवाळी खरेदीसाठी पाच ते सहा बससेवा सुरु करण्यात येणार आहे.
  • वागळे इस्टेट तसेच शहराच्या विविध भागांतून स्थानकाच्या दिशेने होणारी बस वाहतूक नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
  • त्या व्यतिरिक्त दिवाळी सणापुरतीच ही बस सेवा सुरू केली जाणार असून या बसगाडय़ा पवारनगर, पोखरण रोड, वसंत विहार, ब्रह्मांड, वाघबीळ, घोडबंदर तसेच कळवा भागातून गोखले आणि राम मारुती मार्गापर्यंत वाहतूक करणार आहेत.
  • या बसगाडय़ांच्या फेऱ्यांचे नियोजन आखण्याचे काम सुरू असून येत्या
  • १ नोव्हेंबरपासून ही बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.