कासारवडवली ते खारबावदरम्यान खाडीवर पूल; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोंडी सुटणार

घोडबंदर खाडीपल्ल्याड आणि उल्हास नदीच्या काठावर असलेल्या गावांचा विशेष नगर नियोजनातून विकास करून ‘ नवीन ठाणे’ शहर विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने पुढे आणला असून ही गावे ठाणे शहराशी जोडण्यासाठी कासारवडवली ते खारबावदरम्यान खाडीपूल उभारण्यात येणार आहे. याकरिता तज्ज्ञ सल्लागार नेमण्यासाठीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. या खाडीपुलामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फाऊंटन चौकात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

घोडबंदर येथील कासारवडवली खाडीपलीकडे म्हणजेच उल्हास नदीजवळील भिवंडी तालुक्यातील पायगाव, शिलोत्तर, पाये, मालोडी, नागले आणि खारबाव या भागात ‘नवीन ठाणे’ विकसित करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने तशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेपुढे धोरणात्मक मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावानुसार मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या मदतीने हे शहर वसविण्याची महापालिकेची योजना आहे. मात्र ही सर्व गावे घोडबंदर खाडीपल्ल्याड असून सध्या तरी ठाण्याला जोडण्यात आलेली नाहीत. या गावांमधील नागरिकांना ठाणे शहरात यायचे असेल तर वसई किंवा भिवंडी मार्गे शहरात यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन नवीन ठाणे विकसित करताना या गावांना ठाणे शहराला जोडण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आराखडय़ामध्ये खारबाव येथून घोडबंदरला जोड रस्ताही दर्शविण्यात आला असून हा रस्ता तयार करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. याशिवाय, खारबाव रेल्वे स्थानकाजवळ हा पूल उतरविण्याचे प्रस्तावित असल्यामुळे नागरिकांना वसई-भिवंडी-दिवा-कल्याण या शहरात रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

फाऊंटन चौकातील वाहतुकीला पर्याय

उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून जातात. या मार्गावरील वर्सोवा खाडी पुलावरून जड आणि हलकी वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आल्या असून यामुळे येथे वाहतुकीचा वेग मंदावून वाहनांच्या रांगा फाऊंटन चौकापर्यंत पोहोचतात. परिणामी चौकातील वाहतुकीचे नियोजन कोलमडून काशिमीरा तसेच घोडबंदर मार्गावर कोंडी होते. मात्र कासारवडवली ते खारबाव या नव्या पुलामुळे वाहनांना आता पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

खाडी पूल असा..

  • ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्ग ते मोगरपाडय़ांपर्यंत रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. मोगरपाडय़ापासून शंभर मीटर अंतरावर कासारवडवली ते खारबाव असा खाडी पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे.
  • मुंबई-अहमदाबाद महामार्ग ते मोगरपाडय़ांपर्यंत रस्ता आणि मोगरपाडय़ापासून खाडी पुलापर्यंतचा रस्ता महापालिका तयार करणार आहे. तर खाडी पुलाच्या कामाचा प्रकल्प अहवाल केवळ महापालिका तयार करणार असून या पुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.
  • महापालिकेने खाडी पुलाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर निविदा प्रक्रिया उरकून पाच ते सहा महिन्यांत प्रकल्प अहवाल प्राप्त होऊ शकेल, असा अंदाज महापालिका सूत्रांनी वर्तविला आहे.