वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे मनसेच्या मोर्चाचा फटका नाही

भाजप-शिवसेना सरकारविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे शहरात पुकारलेल्या मोर्चामुळे जुन्या ठाण्यात कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेले नियोजन सोमवारी यशस्वी ठरले. मोर्चा दुपारनंतर निघाल्यामुळे सकाळी कामावर निघालेल्यांचा प्रवास सुरळीत झाला. आठ हजारांहून अधिक मोर्चेकरी शहराच्या मध्यभागातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले, मात्र काही तुरळक अपवाद वगळता कुठेही कोंडी न झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

भाजप-शिवसेना सरकारने गेल्या चार वर्षांत केवळ आश्वासने दिल्याचा आरोप करत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मोर्चा आयोजित केला होता. हरिनिवास चौक, तीन पेट्रोल पंप अशा गर्दीच्या भागांतून मोर्चा काढण्यात येणार होता. हा संपूर्ण पट्टा जुन्या ठाण्यातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखला जातो. मोर्चामुळे या भागातील वाहतुकीत अडथळा येण्याची शक्यता विचारात घेऊन दुकानांच्या अवतीभवती गाडय़ा उभ्या रहाणार नाहीत, याची दक्षता घ्या अशा सूचना पोलिसांनी दुकानदारांना दिल्या होत्या. मोर्चामुळे कोंडीत अडकण्याच्या भीतीने ठाणेकर वेळेपेक्षा आधीच घराबाहेर पडले.

मोर्चासाठी जिल्ह्य़ातील कार्यकर्ते बसमधून आले होते. कार्यकर्त्यांना नितीन कंपनीजवळ बसगाडय़ांमधून उतरवून तीन हात नाका चौकात पायी पाठविण्यात येत होते. बसगाडय़ांसाठी मनोरुग्णालयाजवळ, गावदेवी, वृंदावन सोसायटी आणि बाळकुम भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. नितीन कंपनी येथे कार्यकर्त्यांना उतरवल्यानंतर बसगाडय़ा पार्किंगच्या दिशेने सोडल्या जात होत्या. दुपारी महामार्गावर कमी वाहने असल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती. तीन हात नाक्यापासून काही अंतरापर्यंतचा सेवा रस्ता मोर्चेकऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहने पाचपाखाडीतून हरिनिवास मार्गे सोडण्यात येत होती.

दुपारी २.३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. त्यामुळे तीन हात नाका, तीन पेट्रोल पंप, राम मारुती रोड, चरईमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील एका बाजूची वाहतूक काहीकाळ रोखून धरण्यात आली. मोर्चा पुढे गेल्यानंतर रोखून वाहने सोडण्यात आली. वाहनांची संख्या कमी असल्याने फारशी वाहतूक कोंडी झाली नाही.

मूक मोर्चा

ठाणे न्यायालयासमोरील रस्त्यावरून मोर्चेकरी पायी जात असताना काही मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शांतता क्षेत्र असल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी बंद करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. त्यामुळे या भागातून कार्यकर्त्यांनी सरकारविरोधातील पाटय़ा दाखवत मूक मोर्चा काढला.

हातमाग कामगारांचा सहभाग

जिल्ह्य़ातील भिवंडी परिसरातील अनेक कार्यकर्ते मोच्र्यात सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांमध्ये काही हातमाग कामगारांचाही समावेश होता. कंपनीच्या शेठने मोर्चाला जाण्यास सांगितल्याने येथे आल्याचे काही कामगारांनी सांगितले. मोर्चा कशासाठी आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते.