|| नीलेश पानमंद

वर्सोवा पुलासाठीच्या वाहतूक बदलांबाबत संभ्रम कायम 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील नवीन खाडी पुलाच्या दुरुस्ती कामासाठी सोमवारपासून (२६ नोव्हेंबर) करायच्या वाहतूक बदलांना ठाणे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने हरकत घेतली. मात्र, सोमवारपासूनच हा बदल लागू केला जाईल, अशी भूमिका पालघर जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे वाहतूक बदलांची अंमलबजावणी होणार की नाही, हा संभ्रम नागरिकांत रविवारी रात्री उशिरापर्यंत कायम होता.

नियोजित बदलांनुसार गुजरात-मुंबई मार्गिकेवरील अवजड वाहतूक मनोर, शिरसाटफाटा आणि चिंचोटी मार्गे भिवंडीतून वळविण्यात येणार असून त्यासाठी पालघरप्रमाणेच ठाणे जिल्हा प्रशासन आणि शहर वाहतूक पोलिसांनाही अधिसूचना काढावी लागणार आहे. या बदलांच्या नियोजनासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असून तोपर्यंत पालघर जिल्हा प्रशासनाने लागू केलेला बदल पुढे ढकलावा, अशी भूमिका पालघर जिल्हा प्रशासनापुढे मांडल्याची ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

वर्सोवा येथील नवीन खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सुरत-मुंबई या मार्गिकेवरून होणारी अवजड वाहतूक वळविण्यात येणार आहे. ती मनोर, शिरसाटफाटा आणि चिंचोटी मार्गे भिवंडीतून वळविण्याची अधिसूचना पालघर जिल्हा प्रशासनाने काढली असून या बदलांची सोमवारपासून अंमलबजावणी करणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. असे असले तरी या बदलांसाठी पूर्वतयारी झाली नसल्यामुळे सोमवारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्याचे ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी ठरविले आहे.

गणेशोत्सवापासूनच प्रस्ताव 

गणेशोत्सवाच्या काळात मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याच वेळेस वर्सोवा येथील नवीन खाडी पूल दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेवला होता. मात्र, मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्ती कामासाठी केलेल्या वाहतूक बदलामुळे कोंडीची समस्या निर्माण होत होती आणि त्यात हे काम सुरू करण्यात आले असते तर कोंडीत भर पडली असती. ही बाब लक्षात घेऊन पुलाच्या दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले होते, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिली. त्यानंतर दिवाळीच्या काळातही पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पुन्हा ठेवण्यात आला होता. मात्र, दिवाळीच्या काळात कोंडी टाळण्यासाठी पुन्हा प्रस्ताव रोखून धरण्यात आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता नाताळ आणि ३१ डिसेंबरपूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण करायचे असल्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनाने वाहतूक बदलांची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार मनोर, शिरसाटफाटा आणि चिंचोटी मार्गे भिवंडीतून अवजड वाहतूक वळविण्यात येणार असून त्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनानेप्रमाणेच भिवंडी ग्रामीण आणि शहरातील मार्गाकरिता वाहतूक बदलांची अधिसूचना काढावी लागणार आहे. त्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे ही अधिसूचना निघेपर्यंत वाहतूक बदल पुढे ढकलण्याबाबत पालघर जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अतिरिक्त कुमक

ठाणे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी सोमवारपासून वाहतूक बदल लागू करण्यास विरोध केला असला तरी पालघर जिल्हा प्रशासनाने मात्र यासंबंधी पूर्ण तयारी केली आहे. या बदलांची अंमलबजावणी सोमवारपासूनच केली जाईल आणि ठाणे जिल्हा प्रशासनासोबत समन्वय साधला जात आहे, अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या बदलांच्या पाश्र्वभूमीवर पालघर प्रशासनाला दोनशे, तर ठाणे परिसरासाठी अतिरिक्त तीनशे वाहतूक कर्मचाऱ्यांची कुमक पुरविण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.