पुढील महिन्यात सॅटिसची निविदा

ठाणे पूर्व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने आखलेल्या रेल्वे परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पाची मार्गिका (सॅटिस) कोपरी पूल, सिद्धार्थनगर, रेल्वेस्थानक, बारा बंगला अशा भागांतून वळवण्याचा निर्णय पक्का झाल्यानंतर आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पामुळे ठाणे स्थानकापासून कोपरी परिसरात एकप्रकारे सॅटिसच्या मार्गाचे वर्तुळ उभे करण्यात येणार आहे.

या प्रकल्पात ठाणे स्थानक ते घोडबंदर या मार्गावर धावणाऱ्या बसगाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात येणार असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. ठाणे पश्चिम परिसरात महापालिकेने उभारलेला सॅटिस प्रकल्प फारसा प्रभावी ठरला नसला तरी पूर्वेकडील बाजूस होणारी कोंडी दूर करण्यासाठी अशाच एका प्रकल्पाची उभारणी केल्याशिवाय पर्याय नाही, असे महापालिका प्रशासनाचे मत बनले आहे. ठाणे महापालिकेने केंद्र सरकारने आखलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून २६ प्रकल्पांची आखणी केली असून त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण तर काहींचे काम सुरू आहे. याच योजनेच्या माध्यमातून पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांचा गुरुवारी आयुक्त जयस्वाल यांनी सविस्तर आढावा घेतला. हा आढावा घेत असताना सॅटिस प्रकल्पाची निविदा प्रक्रिया जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू करावी, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे आराखडे तयार करण्यात आले असून त्यामध्ये तीन किलोमीटर अंतराची मार्गिका असणार आहे. कोपरी सर्कल, सिद्धार्थनगर, ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व), मंगला हायस्कूल, एसईझेड, कोपरी मलनि:सारण प्रकल्प, वनविभाग कार्यालय परिसर आणि मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्ग अशी ही मार्गिका असणार आहे.

‘स्मार्ट सिटी’शी एकरूप व्हा!

स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या प्रकल्पाशी भावनिकदृष्टय़ एकरूप व्हा, असे आवाहन गुरुवारी जयस्वाल यांनी केले. कोणताही प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा असेल तर या प्रकल्पाशी कर्तव्य भावनेतून नाही तर भावनिकदृष्टय़ा एकरूप व्हावे लागते, असेही ते म्हणाले. या वेळी जयस्वाल यांनी निविदा स्तरावर जे प्रकल्प आहेत त्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून त्या प्रकल्पांची कामे सुरू होतील याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश दिले.  ठाणे स्मार्ट सिटीअंतर्गत सॅटिस (पूर्व), पार्किंग व्यवस्थापन, पादचारी पथ विकास, मल:निसारण, नाला, मासुंदा, हरियाली तलाव सुशोभिकरण, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट यांसह एकूण २६ महत्त्वांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. यातील काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत.

पूर्व परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सॅटिस प्रकल्पाची उभारणी होणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात निविदा काढण्यात येणार आहे. या प्रकल्पाची एकूण रक्कम किती असेल याचा आकडा लवकरच स्पष्ट होईल. पूर्व परिसरातील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी सगळ्या शक्यतांचा अभ्यास करूनच या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.  – संजीव जयस्वाल, महापालिका आयुक्त