वर्सोवा पुलाचा भार ठाणे, भिवंडीवर; वाहतूक पोलिसांची दमछाक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुना खाडी पुलाच्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक गेल्या आठवडय़ापासून घोडबंदर, ठाणे तसेच भिवंडी मार्गे वसईला वळविण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे तसेच भिवंडी शहरावर अवजड वाहतुकीचा भार वाढल्याचे चित्र आहे. दुपार आणि रात्रीच्या वेळेस दोन्ही शहरांतून अवजड वाहनांना जाण्यासाठी मुभा देण्यात आली असल्याने या वेळेत शहरांमध्ये कोंडी होऊ  लागली असून विशेषत: रात्रीच्या वेळेस कोंडीचे चक्रव्यूह भेदताना वाहतूक पोलिसांची अक्षरश: दमछाक होऊ  लागली आहे. आधीच दोन्ही शहरांमध्ये दिवसा कोंडी असताना आता रात्रीच्या वेळेसही ठिकठिकाणी अभूतपूर्व कोंडी होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या पुलावरील वाहतूक नवीन खाडी पुलावरून वळविण्यात आली आहे. परंतु, या पुलावर वाहनांचा भार वाढून महामार्गावर कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहतुकीला या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. ठाणे शहरातून घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक माजिवाडा जंक्शन- मानकोली नाका- अंजुरफाटा- चिंचोटी मार्गे गुजरातच्या दिशेने वळविण्यात आली आहे, तसेच मीरा रोड मार्गे मुंबईच्या दिशेने गुजरातकडे जाणारी अवजड वाहतूक घोडबंदर मार्गे वळविण्यात आली आहे. ही वाहने घोडबंदर मार्गे कापूरबावडी तसेच माजिवाडा या जंक्शनवरून भिवंडी मार्गे पुन्हा गुजरातच्या दिशेने सोडण्यात येत आहेत. पुलाच्या कामासाठी वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलांमुळे ठाणे तसेच भिवंडी शहरात दुपारी आणि रात्रीच्या वेळेस कोंडी होऊ लागली आहे. या पुलाचे काम होईपर्यंत हा बदल लागू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत दोन्ही शहरांना कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

उरणच्या जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. वर्सोवा खाडी पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या बदलांविषयी चालकांना फारशी माहिती नव्हती. त्यामुळे उरण येथून शिळफाटा, मुंब्रा बाह्य़ वळण मार्ग, मुंबई-नाशिक महामार्गाद्वारे माजिवाडा, कापूरबावडी जंक्शन मार्गे चालक वाहने नेण्याचा प्रयत्न करत होते. ही वाहने माजिवाडा, कापूरबावडी जंक्शनवर अडवून त्यांना भिवंडी मार्गे पाठविण्यात येत असल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून रात्रीच्या वेळेस वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता

पोलिसांची कसरत..

ठाणे शहरात सकाळी व सायंकाळी अशा गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी रात्री १० ते सकाळी ८ आणि दुपारी ११ ते ४ यावेळेत अवजड वाहनांना शहरातून जाण्यास मुभा दिली आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात फुटल्याचे चित्र होते. असे असतानाच वर्सोवा पुलाच्या कामामुळे ठाणे व भिवंडी शहरांवर अवजड वाहनांचा भार वाढल्याने दोन्ही शहरात रात्रीच्या वेळेस कोंडी होत आहे. ्रकापूरबावडी व माजिवाडा या जंक्शनवर अवजड वाहने रोखून त्यांना भिवंडी मार्गे वळविण्याची कसरत पोलिसांना करावी लागत आहे.

वर्सोवा खाडी पुलाच्या कामामुळे ठाणे व भिवंडी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुपार व रात्रीच्या वेळेस कोंडी होत आहे. ही कोंडी भेदण्यासाठी नवी मुंबई मार्गे होणारी वाहतूक कल्याणफाटा मार्गे भिवंडीच्या दिशेने वळविण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून दुपारच्या वेळेस शहरात फारशी कोंडी होत नाही. असे असलेतरी रात्रीच्या वेळेस वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे कोंडी होते. ही कोंडी भेदण्यासाठी उपाययोजना आखण्याचे काम सुरू आहे.

– संदीप पालवे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा