पोखरण रस्त्यावरील बस-रिक्षांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी कायम

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला जागोजागी बेकायदा वाहनतळ, रिक्षा थांबे आणि फेरीवाल्यांचा विळखा पडू लागला असून कोटय़वधी रुपयांचे खर्च करत तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांवर पूर्वीपेक्षा अधिक कोंडी होऊ लागल्याचे धक्कादायक चित्र दिसू लागले आहे. कॅडबरी ते वर्तकनगर परिसरात रुंदीकरण करण्यात आलेल्या पोखरण रस्त्यावर सिंघानिया शाळेजवळ उभ्या राहणाऱ्या बेकायदा बसगाडय़ांवर वाहतूक पोलिसांनी महिनाभरापूर्वी कारवाई केली होती. आता त्याच जागेवर बेकायदा रिक्षा थांबा उभा राहिला आहे. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणावर वाहने उभी केली जात असल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे.

ठाणे महापालिकेने आखलेल्या विकास आराखडय़ात ठरविल्याप्रमाणे रस्त्यांची बांधणी करण्याची मोहीम छेडत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जोरदार कारवाई सुरू केली. त्यानंतर अनेक रस्त्यांचे रुंदीकरणही करण्यात आले. या रस्त्यांमुळे ठाणेकरांचा प्रवास सुसह्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, जयस्वाल यांच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेचे जणू प्रतीक ठरलेल्या पोखरण रस्त्यावरच बेकायदा वाहनतळांमुळे कोंडीचे अडथळे उभे राहत असल्याचे चित्र आहे.

नव्या ठाण्याचा हमरस्ता मानल्या जाणाऱ्या पोखरण रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ वाहनांची मोठी गर्दी असते. उपवन, माजिवडा या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांकडून या रस्त्याचा अधिक वापर होत असतो. या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या मिटावी यासाठी प्रशासनाने पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले. मात्र गेल्या काही दिवसांपासून काम सुरू असलेल्या या रस्त्यावर ट्रक, टेम्पो, शाळेच्या बस या वाहनांच्या बेकायदा वाहनतळांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. या अनधिकृत पार्किंगविषयी तक्रारी वाढू लागताच वाहतूक विभागामार्फत जुजबी कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा  नियम धाब्यावर बसवत राजरोसपणे या रस्त्यावर दोन्ही बाजूंस वाहने उभी केली जाऊ लागल्याने पूर्वीची परिस्थिती बरी होती असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. कॅडबरी नाक्यापासून ते शिवाईनगपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंस अजूनही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

या रस्त्याच्या कडेला मोठी वाहने आडव्या पद्धतीने उभी केली जात असल्याने सकाळी आणि सायंकाळी या ठिकाणी मोठय़ा वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. तसेच सिंघानिया शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर सिग्नलच्या ठिकाणीच अनधिकृत रिक्षा थांबा असल्याने शाळेच्या वेळात या ठिकाणी वाहनांची गर्दी होते. शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या पालकांची वाहने याच रस्त्यावर उभी केली जातात.

या अनधिकृत रिक्षा थांब्यावर वाहतूक विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने रस्ता रुंदीकरणाला अर्थ काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अनेकदा चार चाकी वाहने तीन ते चार तास एकाच ठिकाणी उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी मोठा अडसर उभा राहू लागला आहे.

कोंडीची ठिकाणे

  •  सिंघानिया हायस्कूल
  •   शिवाईनगर नाका

नागरिकांच्या प्रवासाला अडथळा होत असल्यास या संदर्भात कायम तोडगा निघण्यासाठी वाहतूक विभागातर्फे सातत्याने कारवाई होत असते. सिंघानिया शाळेच्या बाहेरील अनधिकृत रिक्षा थांब्यावरदेखील कारवाई केली जाईल. ही कारवाई नियमित व्हावी असा प्रयत्न आहे. 

संदीप पालवे, उपायुक्त ठाणे वाहतूक शाखा- वर्तकनगर नाका