News Flash

खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडीची नवी ठिकाणे

ठाण्यातील कापूरबावडी, एलबीएस मार्ग, साकेत पूल, कशेळी-काल्हेर भागांत वाहतुकीचा बोऱ्या

ठाण्यातील कापूरबावडी, एलबीएस मार्ग, साकेत पूल, कशेळी-काल्हेर भागांत वाहतुकीचा बोऱ्या

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : अरुंद रस्ते, वाहनांचा भार यांमुळे ठाणे शहर आधीच वाहतूक कोंडीत सापडले असताना खड्डय़ांमुळे शहरातील मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचे नवे अडथळे उभे राहिले आहेत. शहरातील कापूरबावडी, लालबहादूर शास्त्री मार्ग, माजिवडा-साकेत पूल,  खारेगाव टोलनाका, माणकोली-रांजनोली, रांजनोली-दुर्गाडी, पत्रीपूल ते पलावा, कशेळी-काल्हेर, कोपरी या भागांतील रस्त्यांवर खड्डय़ांमुळे दररोज सकाळी व रात्री वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

यंदाच्या पावसाने ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसीच्या कामाची पोलखोल केली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्री या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे काही रस्त्यांवर पूर्वी वाहतूक कोंडी होत नव्हती, मात्र खड्डे पडल्याने हे रस्तेही वाहतूक कोंडीची नवी केंद्रे होऊ लागली आहेत. या कोंडीत अडकल्यास वाहनचालकांना दररोज अर्धा ते पाऊण तास उशिराने कामाच्या ठिकाणी पोहोचावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एलबीएस मार्ग खड्डेमय

एलबीएस मार्ग- मॉडेला चेकनाका येथून तीन हात नाक्याच्या दिशेने ये-जा करण्यासाठी असलेल्या एलबीएस मार्गावर दोन्ही दिशेकडील मार्गिकांवर खड्डे पडले आहेत. येथील वाहतुकीची गती कमी झाल्यास त्याचा परिणाम तीन हात नाका येथील वाहतुकीवर बसतो.

* साकेत पूल, खारेगाव- साकेत पुलावर खड्डे पडल्याने साकेत पूल ते माजिवडय़ापर्यंत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नाशिक, भिवंडीच्या दिशेने जाणारी जड-अवजड तसेच हलकी वाहने वाहतूक कोंडीत अडकतात. खारेगाव टोलनाका येथेही मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत.

* कशेळी-काल्हेर- या मार्गावरही मोठे खड्डे पडले आहेत. येथे मेट्रो निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते.

* पत्रीपूल ते पलावा- कल्याण येथील पत्रीपूल ते पलावा या मार्गावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्डय़ांतून वाट काढताना नाकीनऊ येत आहेत.

* मुंबई-नाशिक मार्गावरील मानकोली ते रांजनोली आणि रांजनोली ते दुर्गाडी भागातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे.

कापूरबावडी भागात रस्ता उखडला!

कापूरबावडी- ठाणे, मुंबई भागातून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील कापूरबावडी चौकात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडलेआहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावतो. यामुळे कापूरबावडी ते माजिवडा नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी होते.

कोपरी- पुलाजवळही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात कोपरीचा नवा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 10:40 am

Web Title: traffic jams in new area of thane due to potholes zws 70
Next Stories
1 महापालिकांच्या क्षेत्रवाढीचा एमएमआरडीएचा प्रस्ताव
2 ठाण्यातील मुंडा डोंगर हिरवाईने बहरला
3 पालिकेचा आर्थिक गाडा चिखलात
Just Now!
X