ठाण्यातील गावदेवी परिसरात मुजोर रिक्षाचालकांच्या अनधिकृत थांब्याविषयीची वृत्तमालिका ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध होताच वाहतूक पोलिसांनी मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस या भागातील रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली. मंगळवारी सकाळच्या वेळात वाहतूक विभागाने सुमारे ५८ रिक्षांना दंड ठोठावला तर ६ रिक्षांवर निलंबनाची कारवाई केली. बुधवारी या भागातील ८२ रिक्षांना दंड ठोठावण्यात आला होता तर ११ रिक्षा निलंबित करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, पोलिसी खाक्या दाखविल्यामुळे काही काळ भंबेरी उडालेले रिक्षाचालक सायंकाळच्या वेळेत या भागात पुन्हा अवतरले आणि वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून बेशीस्तपणे वागू लागल्याने प्रवासीवर्ग अचंबित झाला आहे.
ठाणे शहरातील वाहतूक नियोजनाच्या आभावामुळे शहरातील प्रमुख चौक अडवणुकीचे थांबे ठरू लागले आहेत. ‘लोकसत्ता ठाणे’च्या मंगळवारच्या अंकामध्ये गावदेवी थांब्यावर सुरू असलेल्या बेशिस्त रिक्षाचालकांच्या कोंडाळ्याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या या थांब्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणेही शक्य होत नाही. या परिस्थितीचे दर्शन घडवल्यानंतर पोलीस विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. शिवाय प्रादेशिक परिवहन विभागालाही या भागात विशेष पथक पाठवून येथील अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या ८२ रिक्षाचालकांना दंड आकारला आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने ११ रिक्षांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील काळात गावदेवी परिसरात अधिक कडक कारवाई अवलंबणार असल्याची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक चौधरी यांनी दिली; परंतु पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर शिस्तीत असलेले रिक्षाचालक बुधवारी दुपारनंतर पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा या भागात अवतरले आणि प्रवाशांची अडवणूक करू लागल्याचे चित्र होते.

अनधिकृत रिक्षांविरोधात तक्रारी करा
भाडे नाकारणे, उद्धट वागणे आणि फसवणूक होत असल्याचा काही त्रास झाल्यास नागरिकांनी तात्काळ पुढे येऊन वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रारी दाखल कराव्यात. गावदेवी परिसरात कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागालाही पत्र देऊन विशेष पथक पाठवून दोषींवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रवाशांना अडचणी असल्यास पोलिसांशी ७०३९००२८६६ या क्रमांकावर तक्रारी करता येतील, असे वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी म्हटले आहे.