डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर प्रवासी मिळवण्यासाठी रस्ते अडवून उभ्या राहणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हे रिक्षाचालक प्रवासी मिळाल्याशिवाय जागेवरून हटत नसल्याने विष्णुनगर भागातील रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी होत होती.
या संदर्भात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत रेडिज यांनी वाहतूक पोलीस, विष्णुनगर पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. दुपारी बारा ते पाच या वेळेत वाहतूक पोलीस या रस्त्यांवर नसल्याने त्याचा गैरफायदा उचलत रिक्षाचालक वाहनतळ सोडून विष्णुनगर भागातील रेल्वेच्या प्रवेशद्वारावर व प्रसाधनगृहाच्या प्रवेशद्वारावर आडव्या रिक्षा लावतात. या रस्त्यावर दोन रांगांमध्ये या रिक्षा उभ्या राहत असल्याने या भागातून बस, ट्रक यांना ये-जा करणे शक्य होत नव्हते. शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या बस या वाहतूक कोंडीत अनेक वेळा अडकून पडत होत्या. बहुतांशी नवखे भूमिपुत्र रिक्षाचालक वाहनतळ सोडून व्यवसाय करण्यात आघाडीवर असल्याच्या तक्रारी होत्या.
विष्णुनगर रेल्वे प्रवेशद्वाराच्या समोर आठ ते दहा व प्रसाधनगृहाजवळ १० ते १५ रिक्षाचालक रस्ते अडवून उभे असत. रेडिज यांनी शनिवारी या भागात ठिय्या आंदोलन करून रस्ते अडवणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. वाहतूक पोलीस, विष्णुनगर पोलिसांनी या आंदोलनाची दखल घेत संबंधित रिक्षाचालकांना तेथून हटविले.
ही कारवाई सतत करण्यात येईल. वाहनतळ सोडून रिक्षा उभ्या करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.