04 March 2021

News Flash

अवजड वाहनांना वाहतूक सेवकांची ‘शीळ’

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी हे वाहतूक सेवक दररोज वाहतूक पोलिसांसोबत शिळफाटा रस्त्यावर दिसू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

| March 17, 2015 12:18 pm

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी हे वाहतूक सेवक दररोज वाहतूक पोलिसांसोबत शिळफाटा रस्त्यावर दिसू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहने रोखण्यासाठी या वाहतूक कर्मचाऱ्यांचा वापर होत असून तेथे त्यांचे काम काय, असा सवाल नगरसेवक जीतेंद्र भोईर यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.
कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेच्या साहाय्याने वाहतूक विभागाने ५० वाहतूक सेवक शहरातील मुख्य रस्ते, चौकात नियुक्त केले आहेत. हे सेवक शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी दररोज सकाळ, संध्याकाळ कल्याण शिळफाटा रस्त्यावर दर्शन देऊ लागले आहेत. डोंबिवलीतील वाहतूक नियमित राहावी यासाठी नेमण्यात आलेले हे सेवक कल्याण-शीळ रस्त्यावर नेमके काय करतात, याचा शोध घ्या अशी मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
कल्याण, डोंबिवली शहरात सीमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. वाहन चालक, बसमधून ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना या वाहतूक कोंडीचा नियमित त्रास होत आहे. महापालिकेच्या रस्ते कामांमुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक विभागाने १०० वाहतूक सेवक देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. यापैकी ५० वाहतूक सेवक पालिकेने दिले. याशिवाय सीमेंट रस्ते कामाच्या ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी स्व:खर्चातून वाहतूक सेवक नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहेत.  
वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या वाहतूक सेवकांचे महापालिका मानधन देणार आहे. यापूर्वी दहा ते पंधरा वाहतूक सेवक कल्याण डोंबिवली परिसरात कार्यरत होते. त्यांचे मानधन महापालिका देते. त्यात नव्याने ५० सेवकांची भर पडली आहे.

‘चौकात पोलीसच नाहीत’
या वाहतूक सेवकांकडून जबाबदारीने काम होत नसेल तर त्यांना देण्यात येणारे मानधन आणि वाहतूक पोलिसांकडून होणारा वाहतूक सेवकांचा दुरुपयोग या विषयीची माहिती वाहतूक उपायुक्त रश्मी करंदीकर यांना देण्याची मागणी भोईर यांनी केली आहे. दरम्यान, वाहतूक सेवक शहरातील चौकात उभे राहत नसल्याने दररोज कल्याणमधील शिवाजी चौक, डोंबिवलीतील इंदिरा चौकात नियमित वाहतूक कोंडी होत आहे. या शिवाय वर्दळीचे डोंबिवलीतील रस्ते पाथर्ली चौक, मंजुनाथ शाळा चौक, दत्तनगर चौक, टंडन रस्त्यावरील ठाकूर सभागृह चौकात वाहतूक पोलिस तसेच ठाकुर्ली रेल्वे फाटक भागात रेल्वे पोलीस नसतात, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:18 pm

Web Title: traffic police create trouble for vehicles at kalyan shilphata road
Next Stories
1 आठवडय़ाची मुलाखत : परंपरेच्या माध्यमातून आधुनिक विचारांची कास
2 वसाहतीचे ठाणे : शहराच्या तिठय़ावरील मध्यमवर्गीयांचा आशियाना
3 ठाणे शहरबात : खोटय़ा अस्मितेचा आजार
Just Now!
X