डोंबिवलीतील महत्त्वाच्या चौकातील वाहतुकीचे नियोजन होत नसल्याने नाराजी

डोंबिवली स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणारा चार रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत.

जेमतेम दोन ते तीन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी डोंबिवलीकरांना १५ ते २० मिनिटे इतका वेळ लागत आहेत. सकाळ-संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी त्यात चार रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे डोंबिवलीकर कमालीचे संतापले असून एवढय़ा महत्त्वाच्या चौकातील वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

एकीकडे स्मार्ट सिटीच्या वल्गना केल्या जात असताना दुसरीकडे स्थानकालगतच्या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतुकीचे तीनतेरा वाजल्यामुळे डोंबिवलीकरांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे. डोंबिवली शहरात काही मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची ठरते आहे. अरुंद रस्ते, वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, रस्त्यांची अर्धवट अवस्थेत असलेली कामे, जागोजागी पडलेले खड्डे यामुळे या कोंडीत दिवसागणिक भरच पडत आहे.

डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील नेहमीच वाहतूक कोंडीत होत असते. या भागातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने ही कोंडी होत असल्याचे पूर्वी चित्र होते. मात्र, हे काम पूर्ण होऊनही परिस्थिती तशीच असल्याने डोंबिवलीकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वाहतूक कोंडीमागील कारणे

मानपाडा रोडवर स्थानकापासून ते चार रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूने रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. चार रस्त्यापर्यंतचा रस्ता हा डांबरी रस्त्यापेक्षा थोडा खाली आला आहे. त्यातच पेव्हरब्लॉकचे काम अर्धवट झाले आहे. पावसाळ्यात चार रस्ता चौकातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे येथून वाहने धिम्या गतीने न्यावी लागतात. यामुळे वाहनांना प्रवास करताना विलंब लागत आहे. शिवाय शहराबाहेरून येणाऱ्या गाडय़ा शहरात प्रवेश करण्यासाठी याच चौकाचा वापर करीत असल्यानेही येथे वाहतूक कोंडी ही नेहमीची समस्या झाली आहे.

पोलिसांची दमछाक

वाहतूक कोंडी होणाऱ्या मुख्य रस्त्यांवर सकाळ संध्याकाळ वाहतूक पोलीस तैनात असतात. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. काही वाहनचालक अनेकदा नियमांचे उल्लंघन करून वाहतूक

करतात. त्यांना दंड करायचा की वाहन कोंडी सोडवायची असाही प्रश्न अनेकदा वाहतूक पोलिसांपुढे असतो. शहरात सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित नाही. त्यामुळे कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांनीही शिस्तीत वाहन चालवून आम्हाला सहकार्य करावे असे एका वाहतूक पोलिसाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.