ठाणे परिसरातील महानगरांमध्ये चैनीच्या वस्तूंसाठी मोठमोठे मॉल्स, सुपरमार्केटस् असले तरी जीवनावश्यक असणाऱ्या भाजीविक्रीची मंडई मात्र अगदीच दुर्लक्षित आणि गबाळी आहे. मासळी बाजारांची स्थिती तर त्याहून वाईट आहे. नाव भाजी मंडई असले तरी अनेक ठिकाणी इतर वस्तूंच्याच दुकानांची भाऊगर्दी आहे. अस्वच्छता हा अनेक भाजी मंडईंचा अविभाज्य घटक आहे. काही निवडक भाजी मंडईंचा हा सचित्र आढावा..

ठाणे शहरातील मुख्य भाजी मंडई असलेल्या जांभळी नाका परिसरात कायम अस्वच्छता आणि दरुगधी असते. लोकमान्यनगर, वागळे, घोडबंदर या ठाणे स्थानकापासून लांब असणाऱ्या परिसरातून नागरिक उत्तम दर्जाच्या भाज्यांसाठी येथील मंडईत गर्दी करतात. आर.ए. राजीव यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाची सूत्रे असताना महापालिका प्रशासनाने भाजी विक्रेत्यांसाठी नवीन इमारत बांधून दिली. मात्र त्या काळातही या नव्या इमारतीचा उपयोग झाला नाही आणि सध्याचे या बाजाराचे चित्र म्हणावे तितके सुनियोजित नाही. भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली असली तरी विक्रेत्यांचा केवळ नफा कमवण्याकडे दृष्टिकोन असतो. यामुळे लहान-मोठय़ा गाळ्यांमध्ये भाजीची विक्री करणारे विक्रेते गाळ्याच्या बाहेर रस्त्यावर ठाण मांडून बसतात.

जिजामाता फळभाजी केंद्रामध्ये प्रवेश करताच पालेभाज्यांचा कचरा पायाखाली आल्याशिवाय राहत नाही. भाजीविक्री करत असलेल्या जागेतच फळभाज्या, पालेभाज्यांचा कचरा टाकण्यात आलेला असतो. याशिवाय भाजी बाजारात दोन्ही बाजूला भाजी, फळांची विक्री होत असताना रस्त्याच्या मध्यभागी वाहनांची पार्किंग आहे. त्यातून वाट काढत नागरिकांना बाजारहाट करावा लागतो.

बसथांब्याची अडवणूक

जिजामाता फळभाजी केंद्राच्या बाहेरच जांभळी नाक्याचा बसथांबा आहे. घोडबंदर, मीरा रोड या ठिकाणाहून लोकमान्यनगर, स्थानक परिसराकडे जाणाऱ्या बस या अरुंद रस्त्यावर थांबतात. मात्र बसथांबाही भाजी विक्रेत्यांनी व्यापलेला असल्याने प्रवाशांनी उभे राहायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित राहतो. बसथांब्याच्या मागे भाजी विक्रेते भाज्या, अन्य सामान ठेवतात तर बसथांब्यासमोर भाजीविक्रीसाठी जागा व्यापतात. यामुळे सायंकाळच्या वेळी भाजी विक्रेत्यांमुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते.