निविदा प्रक्रियेआधीच भूमिपूजन; पाच महिने लोटल्यानंतरही ठेकेदार नेमण्यात रेल्वे प्रशासनाची कुचराई
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन पाच महिने उलटले तरी अद्याप ठाणे रेल्वे स्थानकातील वाहनतळाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. निविदा प्रक्रियेतील दिरंगाईमुळे अद्याप या कामी ठेकेदारच नेमला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
निविदा प्रक्रिया आणि ठेकेदाराची नियुक्ती करण्यात विलंब झाल्याची कबुली देत आता पुढील आठवडय़ात या कामाला सुरुवात होईल, असे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या शुभारंभाच्या घिसाडघाईमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकातून दररोज सुमारे ७ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. स्थानकात दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या दुचाकींची संख्याही सुमारे अडीच हजाराहून अधिक आहे. या वाहनांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात वाहनतळ नसल्याने उघडय़ावर वाहने उभी करावी लागत होती. हे टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २९ जून रोजी दादर स्थानकातून रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने ठाणे रेल्वे स्थानकातील बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन करण्यात आले.
५ कोटी ५० लाख किमतीच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनातील अनेक वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते. १५०० चौरस मीटर क्षेत्रफळ जागेत उभारल्या जाणाऱ्या या वाहनतळात दोन हजार दुचाकी वाहने उभी राहू शकणार आहेत. डिसेंबर २०१६ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र सुरुवातीचे पाच महिने काहीच काम न झाल्याने ठाणे स्थानक परिसरातील इतर सुविधांप्रमाणेच वाहनतळ प्रकल्पही रखडणार हे उघड झाले आहे.
तांत्रिक बाबी पूर्ण करा, नंतर भूमिपूजन करा..
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या समाधानासाठी वारंवार नवनव्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी तात्काळ होताना दिसत नाही. वाहनतळाच्या कामाचे भूमिपूजन करून पाच महिने झाल्यावरही निविदा प्रक्रिया न होणे हा त्यातलाच एक प्रकार आहे. रेल्वे प्रशासनाने आधी तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात नंतर भूमिपूजनाचे कार्यक्रम करावे, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानकातील वाहनतळाच्या कामाची निविदा प्रक्रिया आणि ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ामध्ये वाहनतळाच्या या कामाला सुरुवात होऊ शकणार आहे.
– नरेंद्र पाटील,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे