ठाणे शहरात सर्वत्र सकाळ-संध्याकाळ कोंडी

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अरुंद रस्त्यांवर तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारणीची कामे वेगाने सुरू असली तरी, हीच कामे शहराच्या कोंडीत भर टाकू लागली आहेत. मीनाताई ठाकरे चौक परिसरातील उड्डाण पुलाच्या कामामुळे माजिवडा जंक्शनपासून कोर्टनाका, टेंभीनाका, जांभळीनाका आणि वंदना सिनेमागृहाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सकाळ-सायंकाळच्या वेळेत वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला आहे. अवघ्या दहा मिनिटांचे अंतर कापायला अर्धा तास लागू लागल्याने ठाणेकर प्रवासी-चालक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.

ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाण पूल उभारणीचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या निर्णयानुसार लालबहादूर शास्त्री मार्ग, मीनाताई ठाकरे चौक आणि नौपाडा भागात उड्डाण पूल उभारण्यात येत आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या पुलांची कामे सुरू आहेत. हे तिन्ही पूल अरुंद रस्त्यांवर उभारण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त होत होती. ती भीती आता खरी ठरू लागली आहे.

ठाणे स्थानक परिसरातील वाहतुकीसाठी गोखले आणि राम मारुती मार्ग जितका महत्त्वाचा मानला जातो, तितकाच माजिवडा ते जांभळीनाका या मार्गालाही महत्त्व आहे. ठाणे स्थानकात जाण्यासाठी सोयीस्कर आणि जवळचा मार्ग असल्यामुळे घोडबंदर भागातील बहुतेक नागरिक माजिवडा जंक्शन येथूनच दररोज प्रवास करतात. माजिवडा जंक्शन येथून मीनाताई ठाकरे चौकापर्यंत प्रवास केल्यानंतर नागरिकांना ठाणे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी कोर्टनाका, टेंभीनाका आणि वंदना सिनेमागृहाच्या मार्गाने जावे लागते. मात्र, या ठिकाणी उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

आणखी काही महिने त्रास

नौपाडा आणि अल्मेडा मार्गावरील उड्डाण पुलांची कामे येत्या जानेवारी महिन्यात, तर मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाण पुलाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे आणखी काही महिने ठाणेकरांच्या नशिबी वाहतूक कोंडीचा प्रवास असल्याचे स्पष्ट होत आहे.

१० मिनिटांऐवजी अर्धा तास

माजिवडा ते मीनाताई ठाकरे चौक

  • अंतर ८५० मीटर, वेळ ५ मिनिटे
  • सध्याचा वेळ – १५ ते २० मिनिटे

माजिवडा ते जांभळीनाका

  • अंतर २.४ किमी, वेळ १२ मिनिटे
  • सध्याचा वेळ – अर्धा ते पाऊण तास

माजिवडा ते वंदना सिनेमागृह

  • अंतर २.१ किमी, वेळ १० मिनिटे
  • सध्याचा वेळ – अर्धा तासापेक्षा जास्त

माजिवडा ते कोर्टनाका

  • अंतर १.९ किमी, वेळ १० मिनिटे
  • सध्याचा वेळ – अर्धा तासापेक्षा जास्त

उड्डाणपुलांची कामे सुरू असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता शिल्लक नसल्याने तसेच वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, पुलांचे काम पूर्ण झाल्यावर ही समस्या सुटेल.

अमित काळे, उपायुक्त, ठाणे पोलीस (वाहतूक)