पुणे महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांचा वळसा; वाहनांची संख्या वाढल्याने ठाणे, कळवा, शीळफाटा परिसरात कोंडी

रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अवजड वाहतुकीच्या नियोजनाचे बिघडलेले वेळापत्रक यांमुळे ठाणे आणि आसपासच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडी वाढली असतानाच, आता मुंबई-पुणे महामार्गावरून कोकणाकडे निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनांमुळे अप्रत्यक्षपणे ठाण्यातील कोंडी वाढली आहे. पुणेमार्गे कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अवजड वाहनांनी शुक्रवारपासून माळशेज मार्गाची वाट धरल्याने ठाणे, कळवा, मुंब्रा, शीळफाटा, भिवंडी तसेच मुंबई-नाशीक महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. जेमतेम १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी शुक्रवारी दिवसभर अडीच तास लागत होते.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. तसेच कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या गाडय़ा मुंबई-पुणे महामार्गावरून जात आहेत. या वाहनांची गर्दी गुरुवारी रात्रीपासून वाढू लागली आहे. त्यामुळे एरवी या मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांनी माळशेजमार्गे पुणे, अहमदनगरची वाट धरल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोंडीत भार पडल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून केला जात आहे.

गुरुवारी याच मार्गावर जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही ही कोंडी दूर होऊ शकलेली नाही. मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली वगळता कळवा, मुंब्रा आणि शीळफाटा भागात सकाळच्या वेळेत फारशी वाहनकोंडी नव्हती. दुपारनंतर मात्र या मार्गावर वाहनांची कोंडी वाढू लागली. मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलापासून ते रांजनोली नाक्यापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच मुंब्रा रेतीबंदर ते मुंबई-नाशिक महामार्गापर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. कळवा नाका, शीळफाटा आणि भिवंडी शहरात कोंडी झाली होती. या सर्वच मार्गावर संथगतीने वाहतूक सुरू असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवासी हैराण झाले होते. उरण येथील जेएनपीटी बंदरातून ठाणे आणि भिवंडीच्या दिशेने मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक होत असून या मार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे संथगतीने वाहतूक होत असल्याने या मार्गावर सातत्याने कोंडी होत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते. मात्र, गेले दोन दिवस सलग या मार्गावर प्रचंड कोंडी झाली असून ही कोंडी अवजड वाहतुकीचा वाढलेला भार आणि गणेशमूर्तीच्या वाहतुकीमुळे झाल्याची बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आली आहे.

गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांची वाहने मुंबई-पुणे मार्गे कोकणात जात आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. परिणामी, या मार्गे पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने पुण्याला जाण्यासाठी मुंब्रा-शीळफाटा तसेच मुंबई-नाशिक महामार्गाचा वापर करीत आहेत. जेमतेम पाच ते दहा टक्के ही वाहने असतील. परंतु या वाहनांचा भार वाढल्यामुळेही कोंडी होत आहे.

– संदीप पालवे, ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त