News Flash

एसटीच्या आडमुठेपणामुळे परिवहन सेवेची वाट बिकट

वसई विरार महापालिकेच्या बसेस वसई रोड रेल्वे स्थानकाजवळून सुटतात.

एसटी मंडळाकडून वसई विरार परिवहन उपक्रमाला कसलेच सहकार्य मिळत नसल्याचे परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी सांगितले.

नवघर आगारातून मार्गक्रमण करण्यास मनाई; वसई रोड स्थानक परिसरात मोठी वाहतूक कोंडी
वसई-विरार महापालिका आणि राज्य परिवहन महामंडळ (एसटी) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांचा आणखी एक प्रकार सध्या वसई रोड रेल्वे स्थानकाच्या परिसरात पाहायला मिळत आहे. रेल्वे स्थानक परिसरातील एसटीच्या नवघर आगारात प्रशस्त जागा असतानाही एसटी व्यवस्थापनाने वसई-विरार महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांना येथून जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे परिवहनच्या बसगाडय़ांना अतिशय निमुळत्या रस्त्यातून वाट काढून मार्गक्रमण करावे लागत आहे. याचा परिणाम स्थानक परिसरातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्यात होत आहे.
वसई विरार महापालिकेच्या बसेस वसई रोड रेल्वे स्थानकाजवळून सुटतात. येथील रस्ता अतिशय निमुळता असल्याने परिवहनच्या बसगाडय़ांमुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याच ठिकाणीे एसटीचे नवघर आगार आहे. या आगारात भरपूर जागा आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांना या आगारातून मार्गक्रमण करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाने एसटी व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र एसटी व्यवस्थापनाने ती धुडकावून लावली. उलट याठिकाणी चार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून ते परिवहनच्या बसना आत शिरण्यास मज्जाव करतात. त्यामुळे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांना पूर्ण वळसा घेऊन गाडी पुढे न्यावी लागते. पालिकेच्या बसेसना जागा नसल्याने त्या रेल्वे स्थानकाच्या मुख्य रस्त्यानजीक उभ्या असतात. त्यात रिक्षांची गर्दी असते. हा मुख्य रस्ता असून त्यात बाजारपेठ आहे. लोकांची खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यांची खासगी वाहने या ठिकाणीे उभी केलेली असतात. यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी असते. स्कायवॉक आणि त्याखालील फेरीवाले यामुळे कोंडीत भर पडत असते.
एसटी मंडळाकडून वसई विरार परिवहन उपक्रमाला कसलेच सहकार्य मिळत नसल्याचे परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी सांगितले. एसटीच्या जागेतून आम्हाला रस्ता मिळावा यासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंडळासोबत बैठकही झाली आहे. हा प्रश्न विधानसभेतही विचारण्यात आला होता, पण अद्याप एसटी महामंडळ आम्हाला सहकार्य करत नसल्याचे ते म्हणाले. एसटी आणि पालिकेच्या बसेस या लोकांच्या सेवेसाठी आहेत. पण तरीही एसटी आडमुठेपणा करत आहे. त्याचा फटका शहराच्या वाहतूक कोंडीवर होत असतो, असे गुप्ता यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 1:33 am

Web Title: traffic problem in vasai road
Next Stories
1 दफनभूमी आरक्षणाविरोधात म्हाडा आक्रमक
2 ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करभरणा प्रक्रियेत सुधारणा
3 ठाणेकरांना हाँगकाँगची शब्दसफर
Just Now!
X