वाहतूक कोंडीमुळे कल्याण, डोंबिवलीला जाण्यासाठी चार तास

डोंबिवली : कल्याण-शिळ-महापे मार्गावर बुधवारी रात्री पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या एक ते दीड किमीपर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. डोंबिवली ते महापे या अर्धा तासाच्या अंतरासाठी चार तास लागल्याने वाहनचालकांसह प्रवाशी अक्षरश: हैराण झाले होते. काटई पुलाजवळ उंची मार्गरोधक (हाइट बॅरिअर) पडल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने ही कोंडी झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

कल्याण-शिळफाटा, पनवेल-मुंब्रा आणि नवी मुंबई-शिळफाटा रस्त्यावर बुधवारी दिवसभर वाहतूक कोंडी होती. अर्धा तासाने वाहने पुढे सरकत होती. सायंकाळी चार वाजल्यानंतर या कोंडीत आणखी भर पडली. त्यानंतर वाहने एक ते दीड तासाने पुढे सरकू लागली. सायंकाळच्या वेळेत नवी मुंबई, पनवेल, ठाणे, मुंबईतील खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन येणाऱ्या बस, एस.टी., पालिका परिवहन सेवांच्या बस या कोंडीत अडकून पडल्या होत्या. कार, दुचाकीस्वारांनी कोंडीतून बाहेर पडण्यासाठी उलट्या दिशेने प्रवास सुरू केल्याने कोंडी आणखी वाढली. पुणे, पनवेलकडून येणारी वाहने दहिसर-मोरी, पिंपरी गावाच्या हद्दीत अडकून पडली होती. या भागात वाहनांच्या दोन ते तीन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे आणि सायंकाळी सुरू झालेल्या पावसामुळे कोंडी आणखी वाढली. काही रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडल्या होत्या. शिळफाटा रस्त्यावर कोंडी झाल्याने या रस्त्यालगतच्या गावातून येणाऱ्या पोहोच रस्त्यांवरील वाहने गावच्या रस्त्यावर अडकून पडली. डोंबिवलीतून मानपाडा, घारिवली प्रीमिअर कंपनी, उंबार्ली, निळजे, काटई, देसई, खिडकाळी, पलावातून मुख्य रस्त्यावर येणारी वाहने कोंडीत अडकली होती. शिळफाटा दत्त मंदिर चौकातून टप्प्याटप्प्याने वीस मिनिटे वाहने सोडली जात होती. मात्र, तेवढा वेळ दुसऱ्या मार्गावर वाहने रोखून धरली जात असल्याने त्या मार्गांवर एक ते दोन किमीपर्यंत रांगा लागत होत्या. सायंकाळी आठ वाजेनंतर पुणे, उरण, नवी मुंबई, अलिबाग भागातून मालवाहू अवजड वाहने, कंटेनर नाशिक, गुजरातकडे जाण्यासाठी शिळफाटा रस्त्यावर काटई नाका येथून प्रवेश करतात. ही वाहने बुधवारी रात्री तळोजा-खोणी रस्ता, कर्जत-बदलापूर-काटई नाका रस्त्यावर अडकून पडली होती.

कासवगती प्रवास

तुर्भे नाका येथे प्रवासी रात्री १० वाजता परिवहन बसमध्ये बसले. महापे येथे येण्यासाठी बसला कोंडीमुळे पाऊण तास उशीर झाला. महापे येथून रात्री १०.४५ वाजता सुटलेली बस गणेश घोळ खिंड (शिळफाटा) येथे येण्यासाठी रात्रीचे १२.३० वाजले. शिळफाटा चौकातून (दत्त मंदिर) बस कल्याणकडे येण्यासाठी निघाली असताना देसाई गावापर्यंत बसला रात्रीचे १.४० वाजले. पलावा चौक, काटई नाका, मानपाडा चौक अशी वाहन कोंडीची ठिकाणे पार करत दोन वाजता बसने डोंबिवलीत प्रवेश केला. दोन वाजता उतरल्यानंतर अनेक प्रवाशांना रिक्षा मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना घरापर्यंत पायपीट करावी लागली, अशी माहिती या बसमधील प्रवाशाने दिली.

मागील तीस वर्ष नवी मुंबईत नोकरी करतो. बुधवारसारखी वाहतूक कोंडी नोकरीच्या एवढ्या आयुष्यात कधी पाहिली नाही. तुर्भे नाका येथून डोंबिवलीत येण्यासाठी पाऊण तास लागतो. या प्रवासासाठी चार ते पाच तास लागत होते.

– किरण सूर्यराव, प्रवासी

 

नवी मुंबईतून कल्याण, डोंबिवलीचा प्रवास दीड ते दोन तासांचा आहे. अलीकडे या प्रवासासाठी वाहन कोंडीमुळे तीन ते चार तास खर्ची पडतात. प्रवासात महिलांची किती कुचंबणा होते याचा कधीच कोणी विचार करत नाही.

– चैत्राली करंजकर, प्रवासी

 

काटई पुलाजवळ उंची मार्गरोधक (हाईट बॅरिअर ) पडल्याने तो दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. त्यामुळे बुधवारी रात्री एकाच पुलावरून वाहतूक सुरू असल्याने  वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, आता हे काम पूर्ण झाले आहे.

– अमित काळे, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा