19 November 2019

News Flash

बावळण दुरुस्ती अधांतरी

उरण येथील जेएनपीटी बंदरातून भिवंडीकडे होणाऱ्या मालवाहतुकीसाठी मुंब्रा बाह्यवळण हा महत्त्वाचा मार्ग आहे.

|| किशोर कोकणे

वाहतूक कोंडीच्या मुद्दय़ावरून पोलीस-सार्वजनिक बांधकाम विभागात मतभेद:- दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी चार महिने बंद ठेवल्यानंतर यंदा पुन्हा दुरुस्तीची वेळ ओढवलेल्या मुंब्रा बावळण रस्त्यावरून वाहतूक पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. गतवर्षीच्या वाहतूक कोंडीचा अनुभव लक्षात घेऊन दुरुस्तीकाळात बाह्यवळण रस्ता पूर्णपणे बंद करण्याऐवजी एक मार्गिका सुरू ठेवावी, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. तर बांधकाम विभागाने त्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न अधांतरीच आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून भिवंडीकडे होणाऱ्या मालवाहतुकीसाठी मुंब्रा बाह्यवळण हा महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग धोकादायक झाल्याने गेल्या वर्षी मे महिन्यात या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सुमारे सहाशे मीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चार महिने हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. या काळात अवजड वाहतुकीचा ताण अन्य रस्त्यांवर आल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहरांतील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा उडाले होते. अशातच आता या मार्गाची पुन्हा दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा दुरुस्तीची योजना आखली आहे.

दुरुस्तीसाठी मार्ग बंद ठेवावा लागणार असल्याने त्या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांना पत्राद्वारे केल्या आहेत. मात्र, गतवर्षांचा अनुभव लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी या वेळी सावध पवित्रा घेतला आहे. दुरुस्तीकाळात बाह्यवळण रस्त्याची एक मार्गिका खुली ठेवावी, अशी पोलिसांची भूमिका आहे. तसेच वाहतूक ज्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे त्या मार्गाची पाहणी करून तेथील दुरुस्ती, खड्डे, अतिक्रमण हटविण्यासंबंधीचे पत्र वाहतूक पोलीस संबंधित विभागाला देणार आहे. त्यानंतरच, या मार्गाच्या दुरुस्तीसाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. असे असले तरी मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर एक मार्गिका सुरू ठेवून वाहतूक सुरू करणे शक्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अभियंत्याने सांगितले. त्यामुळे हा पेच कायम राहणार असून ठाणे, भिवंडी, नवी मुंबई येथील  मार्गावर वाहतूक कोंडी सोडविणे शक्य होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पर्यारी रस्तेही  खराब अवस्थेत

बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीमुळे येथील वाहतूक पूर्व द्रूतगती महामार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, मुलुंड-ऐरोली मार्गावरून वळविण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, या मार्गाची स्थिती अत्यंत वाईट आहे. पूर्व द्रूतगती महामार्गावर मेट्रोची कामे सुरू आहेत. तर, रस्त्याची अवस्थाही अत्यंत बिकट आहे. त्यामुळे इतर दिवसांतही वाहने चालविणे या मार्गावर धोक्याचे ठरत आहे. घोडबंदर येथील मेट्रोच्या निर्माणाच्या कामाचा परिणामही द्रूतगती मार्गावर बसण्याची शक्यता आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा, विटावा मार्गावरही खड्डे पडले आहेत. कळवा येथील नव्या पुलाचे बांधकाम यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होणार असून शहरातील वाहतुकीचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. तर, ऐरोलीतील सेक्टर पाच येथील भुयारी रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत.

First Published on November 5, 2019 2:43 am

Web Title: traffic problem police akp 94
Just Now!
X