|| किशोर कोकणे

वाहतूक कोंडीच्या भीतीने केवळ डांबरीकरणाची मलमपट्टी :- मुंबई महानगर क्षेत्रातील अवजड वाहतुकीचा कणा मानला जाणाऱ्या मुंब्रा बाह्यवळण रस्त्याची वर्षभरातच पुन्हा दुरुस्ती करावी लागणार हे स्पष्ट असल्याने या काळात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा धसका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने नादुरुस्त झालेल्या रस्त्यावर डांबरीकरणाची मलमपट्टी करण्यास सुरुवात केली आहे. या मार्गावरील रेतीबंदर पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून खड्डे पडून रस्त्यावरील सळया बाहेर निघाल्या आहेत. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरणाचा मुलामा देण्यास सुरुवात केली असून येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे.

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच मार्गावरून उरण जेएनपीटीहून येणारी हजारो अवजड वाहने मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने ये-जा करत असतात. हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने दीड वर्षांपूर्वी या मार्गाच्या काही भागाची दुरुस्ती करण्यात आली होती. यामध्ये रेतीबंदर येथील भागाचा सामावेश होता. मात्र, पहिल्याच पावसात या मार्गाची चाळण झाली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. महिन्याभरापूर्वी या मार्गावर तीन फूट खोल खड्डा पडल्याचे निदर्शनास आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागावर टीकेचा भडिमार झाल्यानंतर या मार्गाची नव्याने तपासणी करण्यात आली. या रस्त्याची मोठी दुरुस्ती करण्याशिवाय पर्याय नाही, असेही वरिष्ठ अभियंत्यांचे मत बनले आहे. हे काम करण्यासाठी हा मार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करावा लागणार आहे. दीड वर्षांपूर्वीचा अनुभव लक्षात घेता या नियोजित कामामुळे ठाणे-बेलापूर रस्ता, पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच शीव-पनवेल महामार्गावर मोठी कोंडी होण्याची भीती वाहतूक विभागाने व्यक्त केली आहे.

ठाण्याकडील बाजूस कोपरी पुलाचे काम सुरू असल्याने या भागात दररोज मोठी वाहनकोंडी होत आहे. घोडबंदर तसेच आसपासच्या परिसरात मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या कोंडीमुळे येथून प्रवास करणारे त्रासून गेले आहेत. या परिस्थितीत मुंब्रा बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण भराने सुरू केल्याने ठाणे, नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल, अशी वाहतूक पोलिसांना भीती आहे. त्यामुळे या कामाची तारीख निश्चित झालेली नाही.  दरम्यान, मोठे काम सुरू होत नाही तोवर अपघात आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावर डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे. रेतीबंदर भागात हे डांबरीकरण करण्यात येत आहे. यामुळे येथील वाहतूक कोंडीची सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुलावरील भागाचा रस्ता असमान झाला होता. डांबरीकरण झाल्यास वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

वाहनचालकांना दिलासा

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील रेतीबंदर पूल भागात खड्डे पडले होते. तसेच या भागाची दुर्दशा झाली होती. त्यामुळे दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत होती. अवजड वाहनेही येथून जात असल्याने खड्डे, तसेच  असमान रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत असे. या डांबरीकरणानंतर चालकांना दिलासा मिळणार आहे.