|| किशोर कोकणे

वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक

ठाणे : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना रेल्वेच्या लोकलगाड्यांमध्ये प्रवास करण्यास बंदी असल्यामुळे या प्रवाशांचा भार रस्तेमार्गांवर वाढला आहे. यामुळे कल्याण- शिळफाटा, पूर्व द्रुतगती महामार्र्ग, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या शहरांमध्ये सकाळ आणि सायंकाळ अशा गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडे केवळ ७४० अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध असून त्यांची वाहतूक कोंडी सोडविताना दमछाक होत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेच्या लोकलगाड्यांमध्ये सुरुवातीला अत्यावश्यक आणि शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला होता. तर, काही दिवसांपूर्वी महिलांनाही लोकलगाड्यांमधून प्रवासाची मुभा दिली आहे. असे असले तरी अन्य प्रवाशांना अजूनही लोकलगाड्यांमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. या प्रवाशांना खासगी वाहने, बेस्ट, एसटी बसगाड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर वाहनांचा भार वाढून सकाळ आणि सायंकाळ अशा गर्दीच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यातच राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, विविध महापालिकांची रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही रस्त्यांवर पडलेले खड्डे पाऊस थांबल्यानंतरही बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे. कल्याण-शिळफाटा मार्गावरून प्रवास करणाºया प्रवाशांचे दररोज चार ते पाच तास या वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहेत, तर काल्हेर, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या शहरांतील अंतर्गत मार्गांवरही वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडे केवळ ७४० पोलीस अधिकारी आणि कर्मचारीच उपलब्ध आहेत. त्यातही एकाच वेळी सर्वच अधिकारी आणि कर्मचारी कामावर उपस्थित नसतात. दिवस आणि रात्रपाळी असे कर्मचारी विभागण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर असणाºया पोलिसांचे प्रमाण त्याहून कमी असते. पोलिसांच्या मदतीसाठी महापालिकांकडून वाहतूक सेवक दिले जातात.

ठाणे वाहतूक पोलिसांच्या अखत्यारीत ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर अशी शहरे येतात. या शहरांतील रस्त्यांवर होणारी कोंडी सोडविण्यासाठी तेही अपुरे पडू लागले आहेत. तसेच त्यांनाही वाहनचालक फारसे दाद देत नाहीत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.

ठाणे पोलीस दलात वाहतूक पोलिसांचे संख्याबळ कमी असले तरी दररोज पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाहतुकीचे नियमन करतात. तसेच शहरांत विविध यंत्रणांकडून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. संबंधित यंत्रणांचा आमच्यासोबत समन्वय असतो. – अमित काळे, उपायुक्त, वाहतूक शाखा