ठाण्यातील नौपाडा परिसरातील राम मारुती मार्गावर असलेल्या गजानन महाराज मंदिरात २९ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त या परिसरात मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. या काळात गजानन महाराज चौक व राम मारुती रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यास व वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्याकरिता या भागातील वाहतूक बदल करण्यात आले आहेत. १ मार्च रोजी गजानन महाराज चौकात वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तशी अधिसूचना ठाणे वाहतूक पोलिसांच्या वतीने काढण्यात आली आहे.
गजानन महाराज चौकातील या वाहतूक बदलामुळे वंदना टी पॉइंट बाजूकडून राम मारुती रोडने तलावपाळीकडे तसेच गोखले रोडने स्टेशन बाजूस जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस या चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून गजानन चौकातून डाव्या बाजूने दगडी शाळा चौकातून अथवा उजव्या बाजूने तीन पेट्रोल पंप मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. तलावपाळी गडकरी सर्कल बाजूकडून गजानन चौक मार्गे राम मारुती रोडने स्टेशन कडे अथवा तीन पेट्रोल पंप बाजूस जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस दगडी शाळा चौक येथून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यांना पर्यायी मार्ग सदरची वाहने दगडीशाळा चौक येथून उजव्या बाजूस वळून अल्मेडा चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येईल. राम मारुती रस्ता गाडगीळ ज्वेलर्स समोरील चौकाकडून गजानन महाराज चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस गाडगीळ ज्वेलर्स चौकात प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सदरची वाहने गाडगीळ ज्वेलर्स चौकातून उजवीकडे नमस्कार हॉटेल बाजूस अथवा डावीकडे वळून श्रद्धा वडापाव सेंटर मार्गे इच्छितस्थळी जातील. ही अधिसूचना ही पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांस लागू राहणार नाही, असे ठाणे वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी जाहीर केले आहे.