|| आशीष धनगर

ठाणे शहरातील टांगाचालक बधेनात; दरांत कपात करून तलावपाळीभोवती रपेट सुरूच:- जुन्या ठाण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या तलावपाळी परिसरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी या भागातील टांगाचालकांना स्थलांतरित करण्याचा प्रश्न प्रलंबित असतानाच ग्राहकांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी टांगाचालक संघटनेने आठवडाभरापासून नवे दरपत्रक लागू करत प्रत्येक रपेटीमागील दर कमी केल्याने तलावपाळी, शिवाजी पथ तसेच जांभळी नाक्यावरील वाहतूक कोंडी कायम रहाणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी मुंबईतील टांग्यांवर बंदी घातली होती. या निर्णयामुळे राज्यातील इतर शहरांमधील टांग्यांवर बंदी घालावी अशी मागणी होत आहे. ठाणे शहरातील अनेक रस्ते हे आजही अरुंद आहेत. त्यामुळे शहरातील गडकरी रंगायतन, तलावपाळी, जांभळी नाका यांसारख्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर कोंडी होत असते. त्यातच सायंकाळच्या वेळेत रस्त्यांच्या कडेने चालणाऱ्या टांग्यांमुळे येथील वाहतूक कोंडीत मोठी भर पडत असते. गडकरी रंगायतन नाटय़गृहाच्या काही अंतरावर उभ्या असणाऱ्या या टांग्यांचा संपूर्ण तलाव परिसराला वेढा पडला आहे.

शहरात असे सुमारे ७० ते ८० टांगे या ठिकाणी धावतात. त्यामुळे या टांग्यांचे शहारातून उपवन तलावाजवळ स्थलांतर करावे अशी मागणी काही वर्षांपूर्वी जोर धरू लागली होती. ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राजीव यांच्यानंतर आलेल्या आयुक्तांनी मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. शहरातील अरुंद रस्त्यांवर टांगे सफारी करणाऱ्या अनेकांना राजकीय पाठिंबा आहे. त्यामुळे विद्यमान आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही या प्रश्नाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दररोज सायंकाळी टांग्यामुळे होणाऱ्या कोंडीतून मार्ग काढताना नाकीनऊ आलेल्या प्रवाशांना कुणीही वाली नाही असे सध्याचे चित्र आहे.

ग्राहकसंख्या वाढविण्यावर भर

टांगाचालक संघटनेने आठवडाभरापूर्वी रपेटीचे नवे दरपत्रक जाहीर केले. यामध्ये सोमवार ते शुक्रवार एक फेरीसाठी चौघांना १०० रुपये तर शनिवारी आणि रविवारी १५० रुपये असे दरफलक टांग्यांवर लावण्यात आले आहेत. या दरामुळे ग्राहंकाची संख्या वाढेल आणि मनमानी दर आकरणी कमी होईल अशी माहिती आश्वपाल संघटनेतर्फे देण्यात आली आहे. ग्राहकांची संख्या वाढल्यास फेऱ्याही वाढतील आणि धंदा तेजीत येईल असे संघटनेचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक टांगेवाल्यांकडून एका फेरीसाठी मनमानी दर आकारणी करण्यात येत होते. त्यामुळे हे दरपत्रक लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दिवस टांग्यापासून लांब जाणारे नागरिक परत फेरीकडे आकर्षित होत आहेत. – मकरंद केतकर, अध्यक्ष अश्वपाल संघटना

तलावपाळी भागात उभ्या राहणाऱ्या टांग्यांमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्या वेळी वाहतूक शाखेतर्फे कोंडी सोडविण्यासाठी अधिसूचना काढून उपाययोजना करण्यात आली आहे. टांग्यांचा निर्णय पालिकेच्या अखत्यारीत येतो. – अमित काळे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे