सात दिवसांत दंड न भरल्यास खटला
ठाणे शहरातील रस्त्यांवरून जाताना सिग्नल मोडणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, हेल्मेटविना दुचाकी चालवणे असे प्रकार करून सहीसलामत घरी पोहोचण्याच्या भ्रमात असाल तर खबरदार.. ठाणे वाहतूक पोलीस दंडाची पावती घेऊन तुमच्या दारात धडकतील. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडाची पावती थेट घरपोच पाठवण्यास ठाणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. या दंडाचा भरणा सात दिवसांत न केल्यास संबंधित चालकाविरोधात प्रथमवर्ग न्यायालयामध्ये खटला दाखल करण्याची तयारीही वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे.
ठाणे शहरातील लोकसंख्या तसेच वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन महापालिकेने शहराच्या सुरक्षिततेसाठी मुख्य चौकांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील आनंदनगर, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी आणि कापूरबावडी या महत्त्वाच्या जंक्शनचा समावेश आहे. या जंक्शनवरील सीसीटीव्ही कॅमेरे ठाणे वाहतूक पोलिसांच्या अद्यावत नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षातील कर्मचारी या दृश्यांवर नजर ठेवतात आणि त्याआधारे वाहतूक पोलीस शहरातील वाहतुकीचे नियोजन करतात. याच दृश्यांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांचे नंबर टिपून त्यावरील पत्त्याच्या आधारे वाहनचालक वा मालकाच्या घरी दंडाची पावती पाठवण्यात येत आहे.

ठाण्यातील रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांनाही एक सॉफ्टवेअर जोडण्यात आले असून त्याद्वारे शहरामध्ये वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांची छबी आणि त्याची वाहनाची सविस्तर माहिती उपलब्ध होते. त्यामध्ये वाहनचालकाचे नाव, पत्ता तसेच वाहनासंबंधीच्या माहितीचा समावेश असतो. या माहितीच्या आधारे संबंधित चालकांच्या घरी दंडाची पावती पाठविण्यात येत असून गेल्या आठवडय़ापासून ही योजना प्रत्यक्षात सुरू झाली आहे,
– डॉ. रश्मी करंदीकर, ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त

घोडबंदर मार्गावरही सीसी टीव्ही..
मुंबई-नाशिक महामार्गावरील महत्त्वाच्या जंक्शनपाठोपाठ आता घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद या महामार्गावरील कापूरबावडी ते कासारवडवलीपर्यंतच्या मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांच्या आधारेही या भागातील बेशिस्त चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.