मध्य, हार्बर मार्गावरील रविवारचा मेगाब्लॉक असण्याच्या नित्याच्या घटनेत ठाणे रेल्वे स्थानकावर दुपारी एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडली. विद्याविहार स्थानकादरम्यानही  लोकल घसरल्यामुळे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडय़ा पूर्णत: ठप्प झाल्या.

प्रवाशांना लोकलमधून उतरून कुर्ला स्थानक पायी गाठावे लागले. घसरलेल्या लोकलमधून धूरही येत असल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. रात्री १०.४५ च्या सुमारास घसरलेली लोकल रुळावर आणण्यात आली.

ठाणे स्थानकात मेगाब्लॉक आणि प्रगती एक्स्प्रेस इंजिनमध्ये बिघाड अशा दुहेरी समस्यांमुळे रेल्वे प्रवाशांचे रविवारी चांगलेच हाल झाले. रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास इंजिन बंद पडल्यामुळे तासभर ही गाडी ठाणे रेल्वे स्थानकात उभी राहिली होती. त्यामुळे पुण्यावरून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या गाडय़ा खोळंबल्या. याशिवाय पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या गाडय़ांवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने दुपारी १ नंतर इंजिनला हटविले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र  यात जवळपास १ तासाचा कालावधी उलटून गेला. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर ताटकळत राहावे लागले.