वृद्ध, अपंग आणि रुग्ण प्रवाशांची गैरसोय

कोटय़वधी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकांत बसविण्यात आलेले सरकते जिने काही टवाळखोर प्रवासी आणि महाविद्यालयीन तरुणांच्या उपद्रवी प्रवृत्तीमुळे सकाळ-संध्याकाळ बंद असल्याचा प्रकार समोर येत आहे. या टवाळखोरांकडून सरकत्या जिन्यांची बटणे बंद करण्यात येत असल्याने त्याचा गरजू प्रवाशांना नाहक त्रास होतो. विशेषत: वृद्ध, अपंग आणि रुग्णांची त्यामुळे गैरसोय होते.

ठाणे रेल्वे स्थानकात एकूण चार सरकते जिने आहे. त्यातील फलाट क्रमांक तीन-चार आणि पाच-सहाच्या मध्ये प्रत्येकी एक सरकते जिने मोठय़ा पादचारी पुलाला जोडण्यात आले आहेत. तसेच मुंबईच्या दिशेने नव्याने बांधण्यात आलेल्या पादचारी पुलावर फलाट क्रमांक एक आणि दहावर एकेक सरकता जिना आहे. मात्र काही बेशिस्त प्रवासी या सरकत्या जिन्याजवळ असलेले बटन बंद करतात. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांना आपआपल्या कामाच्या ठिकाणी जाण्याची घाई असते. त्यामुळे सरकते जिने बंद असले तरी त्याची सहसा तक्रार कुणी करीत नाही, कारण प्रवाशांकडे तितका वेळ नसतो. मात्र रेल्वे प्रशासन आणि टवाळखोरांविषयी प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. आता या सरकत्या जिन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक रेल्वे प्रशासनाने केली असल्याची माहिती ठाणे स्थानकातील स्टेशन मास्तर सुरेंद्र महिधर यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या दिशेने एक नवा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलावर फलाट क्रमांक १०च्या दिशेने सरकता जिना आहे. मात्र हा सरकता जिना अगदी कोपऱ्यात असल्याने अनेकदा तो बंद असतो, अशी प्रवाशांची तक्रार आहे.