News Flash

बॉम्बस्फोटांपेक्षा रेल्वे प्रवास अधिक संहारक

समस्यांचा पाढा संपत नाही

मुंबई उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर २००४ रोजी मुंबईतील रेल्वे अपघात रोखण्याबाबत रेल्वेला काही आदेश दिले होते. त्यात फलाटांची उंची वाढवून फलाट आणि रेल्वे यातील पोकळी कमी करणे, प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करणे अशा महत्त्वाच्या गोष्टींचा सामावेश होता. मात्र एक तप उलटले तरी या आदेशाची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. मुख्य म्हणजे, काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकातही अनेकदा रुग्णवाहिनी उपलब्ध नसते. महत्त्वाच्या वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागल्याची अनेक प्रकरणे आहेत.

गेल्या काही वर्षांत रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वे स्थानकात असलेली फलाटामधील पोकळी, विजेचा धक्का या कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा बाँबस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आकडय़ांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे हे ढळढळीत उदाहरण आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आल्या. रेल्वे स्थानकातील मुख्य प्रवेशद्वारात कोटय़वधी रुपये खर्च करून यंत्रे बसवली. मात्र, या यंत्रणा चालविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारात ही यंत्रणा बसविण्यात आली असली तरी रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी इतर अनेक छुपे मार्ग आहेत. त्यामुळे या यंत्रणेचाही कितपत उपयोग होतो, असा सवाल निर्माण होत आहे.

रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांकडे रेल्वेच्या गाडय़ा आणि प्रवासी यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. मात्र, या सुरक्षा दलाकडून कितपत सुविधा पुरवली जाते हा प्रश्नच आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकात मधल्या पुलावर एका गर्दुल्ल्याने एका प्रवाशावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या प्रवाशाने धावत जाऊन दुसऱ्या पुलाखाली उभ्या असलेल्या सुरक्षा दलाच्या एका कर्मचाऱ्याला सांगितले. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने माझी जबाबदारी फक्त मी उभा असलेल्या पुलाची आहे, असे सांगून हात झटकले. अखेर त्या प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने त्या गर्दुल्ल्याला हुसकावले. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर आजही गर्दुल्ले मोकाट फिरतात कसे असा प्रश्न आहे. सुरक्षा दलातील कर्मचाऱ्याच्या अशा वागण्यामुळे सामान्य प्रवाशांनी मदत मागायची तरी कोणाकडे? वर्षभरापूर्वी दादर या गर्दीच्या रेल्वे स्थानकात एका २३ वर्षीय तरुणीवर एका गर्दुल्ल्याने चाकूने हल्ला केला.

तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा कमी व्हावा, यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यात लोकप्रतिनिधी आणि रेल्वेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सामावेश केला गेला. तसेच ज्या ठिकाणी रेल्वेचे अपघात जास्त प्रमाणात होतात, त्या ठिकाणावरील धोकादायक भागांची पाहणीही या समितीमार्फत केली होती. मात्र, यानंतरही अद्याप मृतांची संख्या कमी करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात मृत आणि जखमींचा आकडा हा वर्षांला ५०० पेक्षाही जास्त आहे.

ठाणे हद्दीत २०१७ यावर्षी २७९, कल्याण हद्दीत ३०९ तर डोंबिवली हद्दीत १४६ इतक्या जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रेल्वे प्रवासामध्ये जखमी होणाऱ्यांची संख्या ठाण्यात २८९, कल्याण ३१८ आणि डोंबिवलीत १३८ इतका आहे. म्हणजेच मृतांचा आकडा ७३४ तर जखमींचा आकडा ७४५ आहे. अर्थात मृत आणि जखमींच्या आकडय़ात फारसा फरक नाही. ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या हद्दीतील हा आकडा हजारांच्या घरात जात आहे. २०१६ ला या तीन स्थानकात ९३७ जण मृत्युमुखी पडले होते तर २०१५ मध्ये ७५६ जण प्रवासादरम्यान मरण पावले.    रेल्वे प्रशासनाने ठाणे, कल्याण, डोंबिवलीमधील रेल्वे मार्गात अद्यापही सुरक्षा भिंत, पादचारी पूल अथवा भुयारी मार्ग उभारलेले नाहीत. पालिका प्रशासन आणि रेल्वेच्या वादात हे प्रकल्प रखडल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आजही रेल्वे स्थानक गाठण्यासाठी अनेक प्रवाशांकडून रेल्वे रूळ ओलांडण्यासारखे ‘शॉर्टकट’ वापरले जातात. इतक्या जणांचा मृत्यू होऊनही रेल्वे प्रशासनाला अथवा लोकप्रतिनिधींना याचे कोणतेही सोयरसूतक नाही.   महिलांच्या डब्यांमध्ये हमरीतुमरीचे आणि मारामारीचे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. कल्याण, डोंबिवली, बदलापूर अशा गर्दीच्या स्थानकांमधून सकाळचा प्रवास सुकर व्हावा यासाठी प्रवासी आदल्या स्थानकावरून या गाडय़ांमध्ये चढतात. मात्र त्यातही काही महिला प्रवासी इतरांवर ताईगिरी करतात. रात्रीच्या वेळी प्रथम श्रेणीच्या डब्यात रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी पाहायलाही मिळत नाहीत. रेल्वेचा ‘हेल्पलाइन’ क्रमांक पूर्णपणे ‘हेल्पलेस’ झालेला आहे.

समस्यांचा पाढा संपत नाही

सुमारे वर्षभरापूर्वी दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांजवळ सात मीटरचा रुळाचा तुकडा रुळांवर आडवा ठेवण्यात आला होता. सुदैवाने या मार्गावरून जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटला हा रूळ दिसल्याने मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे, जनशताब्दी एक्स्प्रेस जाण्याच्या अवघ्या १७ मिनिटांपूर्वी येथून एक जलद लोकल गेली होती. म्हणजेच, सुमारे ३५० ते ४०० किलोचा हा रूळ अवघ्या १७ मिनिटांच्या आत या रुळांवर टाकण्यात आला होता. या प्रकरणानंतर ठाणे पोलिसांनी मुंब्रा भागातून पाच दरोडेखोरांना अटक केली. त्यांना पकडले होते एका दुसऱ्याच प्रकरणात. मात्र चौकशीत रेल्वेवर रूळ ठेवणारेसुद्धा हेच असल्याचे उघड झाले. अवघ्या दोन हजार रुपयांसाठी हा रुळाचा तुकडा ठेवल्याचे दरोडेखोरांनी पोलिसांना सांगितले. रेल्वे प्रवास किती धोकादायक आहे, हे यातून स्पष्ट होते. अनेकदा रेल्वे पोलीस आणि राज्य पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने तसेच हद्दीचा वाद असल्याने अशा गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष होते. दिवा-पनवेल मार्गावर तसेच पनवेल-उरण मार्गावर घातपाताच्या उद्देशाने असे दोन-तीन प्रकार घडले. ठाण्यापुढे राहणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला रेल्वेच्या या जीवघेण्या प्रवासादरम्यान, जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. त्यामुळे आजही दर महिन्याला सिग्नल बिघाड, रेल्वे रुळाला तडे असे प्रकार होतात. माथ्यावरील अनधिकृत बांधकामांमुळे धोकादायक झालेल्या पारसिकच्या बोगद्याची टांगती तलवार प्रवाशांच्या डोक्यावर आहेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 12:49 am

Web Title: train travel is so dangerous in mumbai
Next Stories
1 शाळा विजेविना!
2 शिवसेना नगरसेवकाचे पद धोक्यात?
3 टीव्ही मालिकांचे बदलते तंत्र चुकीचे!
Just Now!
X