निर्णयासाठी समितीची स्थापना; तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे शासनाचे निर्देश

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव दिनेश जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. राज्य कामगार विमा रुग्णालय वा अन्य सुयोग्य ठिकाणी जिल्हा रुग्णालय स्थलांतरित करण्यासंदर्भात पाहणी करून त्याविषयीचा अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश शासनातर्फे समितीला देण्यात आले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पुर्नबांधणीस राज्य शासनाने मंजुरी दिली असली तरी या कामाचा मुहूर्त बराच काळ लांबणीवर पडला. त्यानंतर सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत शासनाने वेगवेगळे दोन शासन निर्णय जाहीर केले. मात्र आता गेल्या आठवडय़ात पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील ए, बी, सी, डी आणि ई या पाच जुन्या इमारती पाडण्याच्या प्रस्तावाला शासनाने मार्च महिन्यात मंजुरी दिली. रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात आजवर तीन ते चार वेळा प्लास्टरचा काही भाग कोसळला होता. यानंतर जुन्या इमारतींच्या पुर्नबांधणीला राज्य सरकारने मंजुरी दिली.

यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र आधुनिकीकरणाच्या कामासाठी रुग्णालय अन्य ठिकाणी हलवावे लागणार आहे. त्यानंतर पाच महिन्यांनी जुलैमध्ये जिल्हा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याबाबत शासनाने दुसरा शासन निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता राज्य कामगार विमा रुग्णालय वा अन्य सुयोग्य ठिकाणी जिल्हा रुग्णालय स्थलांतरित करण्याचा विचार सुरू असला तरी राज्य कामगार विमा रुग्णालयातील अंतर्गत डागडुजीच्या कामासाठी काही महिने जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

रुग्णालय प्रशासनाकडून शहरातील काही पर्यायी जागांचे प्रस्ताव पुढे आले होते. कशीश पार्कमधील निवासी संकुलातील वाहनतळाच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालय स्थलांतरित करता येईल. तसेच रुस्तमजी आणि मुंब्रा येथील काही जागाही विचारात घेण्यात आल्या आहेत. मात्र या सर्वच जागा रुग्णांना ये-जा करण्याच्या दृष्टीने गैरसोयीच्या आहेत असे सांगण्यात येत आहे.

सहा सदस्यांचा समावेश

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीत सहा सदस्य असणार आहेत. त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, ठाणे महापालिका आयुक्त, अभियान संचालक आरोग्य सेवा संचालनालय आयुक्त, मुंबई तसेच मुंबई आरोग्य सेवा संचालनालय संचालक, ठाणे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे संबंधित सहसचिव या सहा सदस्यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

स्थलांतरणासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र अद्याप याविषयी जिल्हा पातळीवर कोणतीही बैठक झालेली नाही. ती बैठक  झाल्यानंतर स्थलांतरणासाठी प्रस्तावित जागांचा विचार करण्यात येईल.

– डॉ. कैलास पवार, शल्य चिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालय