ठाणे शहरात गेल्या ४० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या एका वास्तूला अचानक गतवैभव मिळण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींचे एकेकाळचे केंद्र असलेला टाऊन हॉल १९७४ नंतर पहिल्यांदाच सरकारी ‘कैदे’तून मुक्त झाला आहे.  १९२८ साली कावसजी दिवेचा या दानशूर व्यक्तीने ज्या उद्देशाने हा हॉल बांधला आणि इंग्रजांकडे सुपूर्द केला, त्या उद्देशाला बाजूला सारून सरकारी जाचात अडकलेल्या या टाऊन हॉलला अखेर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले करून देण्याचे काम विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.ठाण्याच्या कोर्ट नाक्यावर असणारा टाऊन हॉल मात्र न्यायासाठी गेली चाळीस वर्षे प्रतीक्षेत होता. ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या सांस्कृतिक केंद्र म्हणून स्थापन झालेल्या हॉलचा वापर कधी सरकारी गोडाऊन तर कधी रेशनिंगचे दुकान तर कधी निवडणूक कार्यालय अशा विविध शासकीय कामांसाठी होत राहिला. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते स.पा. जोशी यांनी हा हॉल सांस्कृतिक कार्यासाठी खुला करा अशी मागणी केली. त्यांच्या लढय़ाला आता खऱ्या अर्थाने यश आले आहे. शहर चारी दिशांना वाढत गेले. उंच इमारती उभ्या राहिल्या, लग्न समारंभाचे हॉलही अनेक ठिकाणी सजले, मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अशी एखादी जागा जी सवलतीच्या दरात कलाप्रेमींना उपलब्ध करून देण्यात ठाणे महापालिका अपयशी ठरली. गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह उभे राहिले, पण पुस्तक प्रकाशनासारख्या किंवा कविसंमेलन आणि ग्रंथोत्सव यासाठी आवश्यक असणारी जागा मात्र या दोन्ही नाटय़गृहामध्ये नाही. जे हॉल उपलब्ध आहेत त्यांची भाडी परवडत नाहीत. ठाणे महापालिकेच्याच इमारतीत असणारा आणि चित्रकार नरेंद्र बल्लाळ यांचे नाव असलेला हॉल ताशी २३०० रु. भाडय़ाने महापालिका कलाप्रेमींना देते. पुस्तकांना चांगले दिवस यावे आणि नाटय़गृहांमध्ये पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम व्हावेत अशी इच्छा जरी अनेकांची असली तरी हौशे-नवशे अनेक जण लेखन करत आहेत. अशा वेळी नव्या लेखकाला आणि प्रकाशकाला हे सारे अर्थकारण परवडणारे नसते. म्हणून टाऊन हॉल ठाणेकरांना सांस्कृतिक कामासाठी खुला करून देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. या निमित्ताने ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळेल. ठाण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत भर उन्हाळ्यात अशा कार्यक्रमांचे टाऊन हॉल हे केंद्रस्थान ठरेल यात शंका नाही. या हॉलच्या बाजूलाच खुले प्रेक्षागृह, वृक्षांचे सुशोभीकरणही करण्यात आले असून या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाने ठाण्यातील नामवंत चित्रकारांना आणि शिल्पकारांना बोलावून त्यांनी रेखाटलेली चित्रे आणि शिल्पेही लावण्यात आली आहेत.