ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या समिती सदस्यपदासाठी येत्या २० जूनला होणारी निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. परिवहनची ही निवडणूक नियमबाह्य़ असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून परिवहन सदस्यपद मिळविण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे खेटे घालणाऱ्या इच्छुकांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे.
ठाणे महापालिकेची परिवहन समितीही गठित करण्याचा निर्णय घेतानाच या समितीवर नगरसेवकांऐवजी बाहेरील सदस्यांची निवड करण्याचा धोरणात्मक निर्णयही सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानंतर या समितीवर सदस्यांची निवड करण्यासाठी महापालिका प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार येत्या १७ जूनला अर्ज दाखल करण्याची मुदत होती, तर २० जूनला सदस्यपदाची निवडणूक होणार होती. मात्र सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आलेल्या धोरणावर महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते आदींच्या स्वाक्षऱ्या नाहीत. तसेच आयुक्तांची त्यास मान्यता घेण्यात आली नाही, असा आक्षेप घेत कॉंग्रेसचे गटनेते संजय घाडीगावंकर यांनी ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने निवडणूक स्थगित केली आहे. मध्यंतरी अशाच प्रकारे परिवहन समिती सदस्यपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता आणि इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र काही कारणास्तव ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. आताही तसेच घडल्याने परिवहनमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास झाला आहे.