10 August 2020

News Flash

परिवहन आगारात बेकायदा इंधनपंप

 स्थानिक नगरसेविका पुष्पा घोलप यांचे निवासस्थान या इंधन पंपाच्या शेजारी आहे.

ठेकेदाराकडून विनापरवाना इंधनाचा साठा; भरवस्तीत दुर्घटनेची भीती

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन ठेकेदाराने नालासोपारा येथील भर वस्तीत असणाऱ्या आगारात बेकायदा इंधनपंप उभारला आहे. सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून तसेच कुठलाही परवाना न घेता हा पंप उभारल्याने परिसरातील नागरी वस्तीला मोठा धोका निर्माण झालेला आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

आगीच्या वाढत्या घटना, त्यातून होणारी जीवितहानी यामुळे अग्निसुरक्षेबाबत कठोर उपाययोजन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. सर्व आस्थापनांची अग्निसुरक्षा करण्यास बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र अग्निसुरक्षेबाबत पालिकेच्या परिवहन ठेकेदाराकडूनच हरताळ फासला गेल्याचे उघड झाले आहे. परिवहन आगारात बेकायदा इंधनपंप उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे.

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या खासगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. नालासोपारा पूर्वेला परिवहनचे आगार आहे. या ठिकाणी बसमध्ये इंधन भरण्यासाठी ठेकेदाराने इंधनाचा पंप उभारला असून मोठी टाकी बसवली आहे. या टाकीत इंधन साठवून ते पंपाद्वारे बसमध्ये भरले जात आहे. हा पंप भर वस्तीत उघडय़ा जागेवर आहे. या इंधनपंपापासून अवघ्या १०० मीटरवर शाळा असून बाजूला नागरी वस्ती, गृहसंकुले आणि बाजारपेठा आहे. इंधन पंपाजवळ मोठी टाकी बांधण्यात आली असून या टाकीमध्ये हजारो लिटर डिझेल साठविण्यात येत आहे. मात्र अशाप्रकारे डिझेलसाठा करण्याचा पेट्रोलियम विभागाचा कुठलाच परवाना ठेकेदाराकडे नाही. तसेच डिझेलचा साठा करताना कुठल्याही अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याने परिसराला मोठा धोका असल्याची तक्रार पर्यावरण विषयावर काम करणारे कार्यकर्ते चरण भट यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हा इंधन पंप बेकायदा तर आहेच, मात्र त्यात सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याने मोठा धोका निर्माण होऊ  शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी वसईच्या तहसीलदारांना तात्काळ पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. ठेकेदाराचे परिवहन व्यवस्थाक तुकाराम शिवभक्त यांनी इंधनपंपासाठी परवाना नसल्याचे मान्य केले आहे. मात्र या इंधनपंपातून केवळ बायोडिझेल वापरले जाते. बायोडिझेलला ४५ हजार लिटपर्यंत साठा करण्यासाठी परवानगी लागत नसल्याचा दावा केला. बायोडिझेलमुळे कसलाही धोका नसतो, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक नगरसेविका पुष्पा घोलप यांचे निवासस्थान या इंधन पंपाच्या शेजारी आहे. ते याबाबतीत अनभिज्ञ होत्या. नंतर त्यांना संपर्क केला असता या ठिकाणी इंधनपंप असून याविरोधात परिवहनकडे तक्रार करू, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी वसईच्या तहसीलदारांना याबाबत तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

परिवहन आगारातील इंधन परवाना माझ्या काळात दिलेला नाही. त्यामुळे अग्निसुरक्षा तपासणी झालेली नाही.

– दिलीप पालव, मुख्य अग्निशमन अधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पुरवठा अधिकारी पाठवून पाहणी करून कारवाई केली जाईल.

– किरण सुरवसे, तहसीलदार, वसई

बसआगारात बायोडिझेलचा साठा किती प्रमाणात आहे, इंधन पंपासाठी शासनाचे काय आदेश आहेत तसेच यासाठी परवानगी घेतली आहे की नाही, याची रीतसर तपासणी केली जाईल.

– संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

परवानगी देण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत, मात्र आम्ही जागेवर जाऊन पाहणी करू. सुरक्षेचे नियम आहेत का, परवाना आहे का, कुठले इंधन आहे, ते तपासून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर केला जाईल.

– शशिकांत म्हस्के, पुरवठा निरीक्षक, वसई तहसीलदार कार्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 12:56 am

Web Title: transport contractors build illegal fuel pump in nalasopara bus depot zws 70
Next Stories
1 बेरोजगाराला ५० हजारांचा गंडा
2 ‘करोना’च्या अफवेने मागणीत घट!
3 भाजपा नगरसेवक नारायण पवार यांना खंडणीप्रकरणी अटक
Just Now!
X