News Flash

वाहतूक कोंडीवर पर्याय ‘ट्रान्सपोर्ट कॉरीडॉर’चा

मुंबईसह प्राधिकरण क्षेत्रात विविध आस्थापनांमध्ये सुमारे चाळीस लाख नोकरीच्या संधी आहेत.

 

२० वर्षांच्या नियोजनाचे प्राधिकरणाचे प्रयत्न

‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ क्षेत्रातील शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत असताना तेथील वाहनांचा भार उपलब्ध रस्ते, व्यवस्थेवर पडत आहे. त्यामुळे प्राधिकरण क्षेत्रात मोठय़ा वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. हा विचार करून प्राधिकरणाने एकत्रित वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून महानगर प्रदेशात स्वतंत्र ‘ट्रान्सपोर्ट कॉरीडॉर’ (विशेष वाहतूक मार्ग) उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती प्राधिकरणातील एका उच्चपदस्थ सूत्राने दिली. प्राधिकरणाच्या आगामी वीस वर्षांच्या भविष्यवेध प्रकल्पात या विशेष वाहतूक मार्गाचा उल्लेख आहे.

मुंबईसह प्राधिकरण क्षेत्रात विविध आस्थापनांमध्ये सुमारे चाळीस लाख नोकरीच्या संधी आहेत. या चाळीस लाखांपैकी जवळपास ६८ टक्के नोक ऱ्या मुंबई क्षेत्रात आहेत. त्यामुळे रायगड, ठाणे, पालघर परिसरातील नोकरदार रेल्वे, बस, खासगी वाहनांच्या माध्यमांतून आपल्या नोकरीच्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘एमएमआरडी’च्या अहवालानुसार सरकारी, खासगी आस्थापनाव्यतिरिक्त अनेक लहान, मोठय़ा उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या २००१ मध्ये ७२ लाख होती. ही संख्या २०११ मध्ये ९१ लाख झाली आहे. ज्या प्रमाणात नागरीकरण होत आहे.

लोकसंख्या वाढत आहे. त्या प्रमाणात सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने, सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण दहा टक्क्यांनी घटल्याचे प्राधिकरणाच्या  सव्‍‌र्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

नोकरी, व्यवसायासाठी दररोज रेल्वे, बस, टॅक्सी, रिक्षा, दुचाकी, पायी प्रवास अशा माध्यमातून प्राधिकरण क्षेत्रातील २ कोटी ८३ लाख रहिवासी दैनंदिन प्रवास करीत असतात. पूर्व, पश्चिम आणि पनवेल द्रुतगती महामार्गावरून दररोज मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात ५५ हजार वेगळ्या प्रकारची वाहने येजा करीत असतात. नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवली परिसरात उद्योग व्यवसाय असल्याने दररोज लाखो टनाची अवजड वाहतूक या भागातील रस्त्यांवरून होतो. शहरे, उद्योग वाढत असून त्या प्रमाणात तेथे जाण्यासाठी सार्वजनिक बसची सुविधा नसल्याने बहुतांशी प्रवासी या नव्याने विस्तारित क्षेत्रात जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षा, टमटम या वाहनांचा वापर करत आहेत. प्राधिकरण क्षेत्रात दरवर्षी ४ टक्के रिक्षा, ३ टक्के टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्राधिकरण क्षेत्रात दररोज १० लाख दुचाकी, ६३ लाख कारची येजा सुरू असते. येणाऱ्या काळात मुंबईपेक्षा ठाणे, कल्याण, पेण, रायगड परिसरात झपाटय़ाने नागरीकरण होत असल्याने या भागात खासगी वाहनांची संख्या दुपट्टीने वाढू शकते, असा अंदाज प्राधिकरणाच्या अहवालात नोंदविण्यात आला आहे.

दीड कोटीपर्यंत रोजगाराच्या संधी

२०११च्या जनगनणेप्रमाणे मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्राची लोकसंख्या १ कोटी २४ लाख ४२ हजार आहे. येणाऱ्या काळात ही लोकसंख्या ३ कोटीपर्यंत पोहचणार आहे. प्राधिकरण क्षेत्रात २०३१ पर्यंत दीड कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्राधिकरण प्रशासनाचा मानस आहे. वाढत्या नागरीकरण आणि उद्योग व्यवसायांच्या संधीमुळे प्राधिकरण क्षेत्रात २००५ मध्ये जी २० लाख खासगी वाहन संख्या आहे, ती २०३१ पर्यंत ९० लाखांपर्यंत पोहोचणार आहे. या वाढत्या वाहन संख्येचा विचार करून येणाऱ्या काळात प्राधिकरण क्षेत्रात एकत्रित वाहतूक सेवा (कॉम्प्रेहेन्सिव्ह ट्रान्स्पोर्ट सव्‍‌र्हिस), वाहतुकीच्या स्वतंत्र मार्गिका लघू (कॉरिडॉर), दीर्घ फेऱ्यांचे मार्ग अशा दीर्घकालीन वाहतूक सुविधा देण्याच्या हालचाली प्राधिकरणाने सुरू केल्या आहेत, अशी माहिती प्रदेश प्राधिकरणातील सूत्राने ‘लोकसत्ता’ला दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:45 am

Web Title: transport corridor for traffic problem
Next Stories
1 सातबाराच्या फेऱ्यात ‘सूर्या’
2 ठाण्यात ‘नेटवर्क बंदी’ ; १०० मोबाईल टॉवर्सवर जप्तीची कारवाई
3 गॅलऱ्यांचा फेरा : ‘शुभकाळ’सूचक गुरुवार
Just Now!
X