भाईंदर : गेल्या अनेक महिन्यांपासून पत्रव्यवहार करूनदेखील मीरा-भाईंदरच्या वाहतूक विभागाला कारवाई करून जप्त केलेली वाहने ठेवायला जागा उपलब्ध  झालेली नाही. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाकडून सुचवण्यात आलेल्या जागेवर राजकीय डोळा असल्यामुळे जागा उपलब्ध होत नसल्याचा संशय निर्माण झाला आहे.

मीरा-भाईंदरमधील स्थानिक वाहतूक शाखेकडून जप्त करण्यात येणारी वाहने काशिमीरा येथील भूमापन क्रमांक १५(३) वरील जागेत ठेवली जात आहेत. या जागेत कामगार रुग्णालय बांधण्यात येणार असल्याने ती जागा रिकामी करण्यात यावी, यासाठी  ईएसआयसी (एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोशन) ने पालिका, जिल्हाधिकारी, वाहतूक शाखेकडे मागितली आहे.  पर्यायी जागा म्हणून मीरारोड येथील भूमापन क्रमांक २३३ वरील जागा उपलब्ध करून दिली आहे. ती जागा ही राज्य शासनाच्या ताब्यात आहे.  मात्र प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे वाहतूक विभागाला अद्याप जागा उपलब्ध करून दिली नसल्याचे समोर आले आहे.

कामगार रुग्णालयाचे काम  रखडले असल्यामुळे वाहतूक विभागाला जागा मोकळी करण्याकरिता आतापर्यंत तब्बल तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आता आहे. त्यामुळे आता गोदामामध्ये असलेली वाहने कुठे घेऊन जाव्या असा प्रश्न वाहतूक विभागाला पडला आहे. याकरिता ठाणे ग्रामीण पोलीस विभागाकडून पत्रव्यवहार झाल्यानंतरदेखील दिरंगाई करण्यात आली होती. परंतु सातत्याने वाहतूक विभागाकडून पाठपुरवठा केल्यानंतर त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने अप्पर तहसीलदार नंदकुमार देशमुख यांना पत्र पाठवून त्या जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दिरंगाईचे नेमके कारण काय?

मीरा रोड येथील सव्‍‌र्हे क्रमांक २३३ वरील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन प्रस्तावित करण्यात आले  आहे. तसेच विहंग एज्युकेशन ट्रस्टने या जागेत शाळेचा प्रस्ताव महसूल विभागाला सादर केला आहे. त्यामुळे या जागेवर नेमका निर्णय घेण्यास प्रशासन दिरंगाई करत आहे. तसेच राजनैतिक कारणामुळे हा सर्व घोळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

२३३  या भूमापन क्रमांकावर पाहणी करून अहवाल तयार करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत योग्य अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे.

– नंदकुमार देशमुख, अप्पर तहसीलदार