भविष्यात नवीन कर्मचाऱ्यांनाच वाहनचालकांच्या घरी धाडण्याचा ठाणे पोलिसांचा विचार

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडाची पावती घरपोच पाठवण्याची ठाणे पोलिसांनी महत्त्वाकांक्षी योजना पावती पाठवण्यासाठी येणारा पोस्टाचा खर्च कुणी करायचा या मुद्दय़ावरून रखडली आहे. पोस्टाद्वारे एक पावती पाठवण्यासाठी येणारा पाच ते २० रुपयांपर्यंतचा खर्च कुणी करायचा, यावरून ठाणे पोलीस आणि राज्याच्या गृहविभागात खलबते सुरू आहेत. त्यामुळे आता ठाणे वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात आणखी कर्मचारी येताच, त्यांना या कामाला जुंपण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांच्या दारात वाहतूक पोलीसच दंडाची पावती घेऊन धडकण्याची शक्यता आहे.

भरधाव वाहन चालवणे, सिग्नल मोडणे, हेल्मेटविना दुचाकी चालवणे अशा प्रकारांमुळे अपघातांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवून वाहतूक नियंत्रण शाखेत बसविण्यात आलेल्या ‘व्हिडीओ वॉल’च्या साह्य़ाने बेशिस्त वाहनचालक टिपून त्यांना घरपोच दंडाची पावती पाठवण्याची योजना वाहतूक पोलिसांनी वर्षभरापूर्वी आखली होती. ठाणे महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागात सुमारे ४० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील तीन हात नाका, नितीन कंपनी, आनंदनगर तसेच कापुरबावडी या महत्त्वाच्या चौकांमध्ये हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ‘व्हिडीओ वॉल’द्वारे सिग्नल तोडणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. याच माहितीच्या आधारे संबंधित चालकांच्या घरी दंडाची पावती पाठविण्याची योजना वाहतूक पोलिसांनी आखली होती. परंतु ही योजना प्रत्यक्षात सुरू होऊ  शकलेली नाही. दंडाची एक पावती पोस्टाद्वारे पाठविण्यासाठी सुमारे पाच ते वीस रुपये खर्च अपेक्षित असून, या खर्चासाठी वाहतूक शाखेकडे स्वतंत्र निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या खर्चाचा भार पेलवायचा कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला असून त्यामुळे ही योजना अद्याप प्रत्यक्षात उतरू शकलेली नाही.

वाहतूक पोलिसांमार्फतच घरपोच दंडाची पावती पाठविता येऊ शकते का, याचा विचार सुरू आहे, मात्र सध्या वाहतूक शाखेच्या ताफ्यातील पोलिसांचे संख्याबळ कमी आहे. यामुळे वाहतूक पोलिसांचे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून हे संख्याबळ वाढल्यानंतरच ही योजना राबविता येऊ शकेल.

– आशुतोष डुम्बरे, ठाण्याचे सह पोलीस आयुक्त