तीन हात नाका कोंडीवर उपाय धूसर; कोटय़वधीचे सल्लागार शुल्कही वाया

जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्ग आणि ठाणे शहराच्या अंतर्गत रस्त्यांना जोडणाऱ्या तीन हात नाका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात आखण्यात आलेला २६० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी वाहतूक सुधारणा प्रकल्प वर्ष सरता सरता गुंडाळण्याचा निर्णय अभियंता विभागाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक विभागाकडून मोठा निधी मिळेल अशी अपेक्षा महापालिकेला होती. यासाठी सल्लागार नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आतापर्यंत काही कोटी रुपयांची उधळणही अभियंता विभागाने केली आहे. प्रत्यक्षात तीन हात नाका परिसरातून येणारी नवी मेट्रो मार्गिका आणि मुंबई महापालिकेच्या मोठय़ा जलवाहिनेचा येत असलेला अडसर त्यामुळे वाहतूक सुधारणा प्रकल्पाची अंमलबजावणी जवळपास अशक्य असल्याचे मत अभियंता विभागाने व्यक्त केले आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका चौक हा महामार्ग आणि शहरातील अंतर्गत मार्गाना जोडणारा मोठा दुवा आहे. हा चौक वाहनांनी सदैव गजबजलेला असतो. हे लक्षात घेऊन महापालिकेने या संपूर्ण परिसराचा वाहतूक सुधारणा प्रकल्प आखण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जाणारे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी  यासाठी अभ्यासगट नेमून हा आराखडा कसा असेल याचे प्रात्यक्षिक पत्रकार आणि नगरसेवकांपुढे सादर केले. त्यानंतर या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करून त्यासाठी केंद्र सरकारची आर्थिक मदत घेण्याचे ठरविण्यात आले. यासाठी पुन्हा एक सल्लागार कंपनी नेमण्यात आली. या कंपनीला काही कोटी रुपयांचे मानधनही देण्यात आले. या कंपनीने अभियंता विभागाच्या मदतीने २३९ कोटी रुपयांचा सविस्तर असा वाहतूक सुधारणा आराखडा तयार केला. त्यानंतर तो केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यासाठी खास बैठकाही घेण्यात आल्या. इतक्या प्रयत्नानंतरही केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी मंजुरी तर मिळाली नाहीच शिवाय नव्या मेट्रो मार्गिकेचा अडथळा या प्रकल्पात आल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या यादीतून बाहेर काढण्याची नामुष्की आता महापालिकेवर आली आहे. सद्यस्थितीत स्मार्ट सिटी प्रकल्पातून हा प्रकल्प वगळून महापालिकेमार्फत तो राबविला जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पुढील काही काळ हा प्रकल्प राबविणे शक्य नाही, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ सूत्रांनी दिली.

अडथळ्यांचा यादी मोठी

’ तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाची आखणी करताना या भागातून भविष्यात मेट्रोची मार्गिका जाईल याचा विचार सल्लागार कंपनी आणि अभियंता विभागाने केला होता. मात्र, मेट्रो मार्गिकेची आखणीमध्ये पुढे काही प्रमाणात बदल होत गेला.

’ मुलुंड भागातून तीन हात नाक्याच्या दिशेने एलबीएस मार्गावरून येणारी मेट्रोची मार्गिका पुढे काही प्रमाणात बदलण्यात आली.

’ ठाण्यातील आनंदनगर भागात मेट्रो मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची उंची चार मीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वाहतूक सुधारणा प्रकल्पासाठी तीन हात नाका उड्डाणपुलावरून एलबीएस मार्गाच्या दिशेने उभारण्यात येणारा उड्डाणपुलाच्या मार्गात अडथळा उभा राहिला.

’ वाहतूक सुधारणा प्रकल्पास काही ठिकाणी भुयारी मार्ग आणि काही ठिकाणी उड्डाण मार्गाची आखणी करण्यात आली होती. तीन हात नाका भागातून मुंबई महापालिकेची २४००-३००० मीटर व्यासाची जलवाहिनी जाते. या वाहिनीचा अडथळा भुयारी मार्ग तसेच उड्डाण मार्गाना येत असल्याने हा प्रकल्प तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.