21 October 2020

News Flash

परिवहन ठेका रद्द न झाल्याने बसगाडय़ा जागीच

व्यवस्था स्वबळावर सांभाळण्याचा पालिकेचा निर्णय अधांतरी

व्यवस्था स्वबळावर सांभाळण्याचा पालिकेचा निर्णय अधांतरी; नागरिकांची गैरसोय

भाईंदर : परिवहन कंत्राटदाराचा ठेका रद्द करून बसगाडय़ा स्वत: चालवण्याचा निर्णय मीरा-भाईंदर पालिकेने १२  दिवसांपूर्वी घेतला होता. परंतु, अद्याप ठेका रद्द झाला नसून बस  जागीच उभ्या असल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.

करोनाकाळात परिवहन सेवा बंद करण्यात आली. पालिकेची परिवहन सेवा खासगी तत्त्वावर चालविण्यात येत आहे. याचा ठेका भगीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन कंपनीला १ ऑगस्ट २०१९ रोजी दिला होता. पालिकेच्या सेवेत एकूण ७४ बसगाडय़ा  असून यापैकी पाच गाडया वातानुकूलित आहेत. मीरा-भाईंदर पालिका परिवहन सेवा चालविण्यासाठी ठेकेदारास प्रति किलोमीटर ४२ रुपये याप्रमाणे मोबदला देण्यात येत होता. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पालिकेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता.

अशा  परिस्थितीतही मीरा-भाईंदर पालिकेकडून  ठेकेदाराला दोन टप्प्यांत साधारण दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु, तरीही ठेकेदाराकडून ९० टक्के कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून पगार न दिल्याचे समोर आले होते. याशिवाय कंत्राटदाराने अधिक कोटय़वधी रुपयांची मागणी केली आहे.

त्याद्वारे कर्मचाऱ्यांना पगार उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाच ठेका पद्धतीने हाताशी घेऊन परिवहन सेवा  स्वत: चालवण्याचा निर्णय ९ सप्टेंबर रोजी प्रशासनाने घेतला होता.

यात पहिल्या टप्प्यात एकूण ३५ बस शहरातील आवश्यक मार्गावर चालविण्यात येणार होत्या. तर  गरज भासल्यास बसगाडय़ांच्या संख्येत वाढ करण्याचा  निर्णयही घेण्यात आला होता. याव्यतिरिक्त भगीरथी ट्रान्स कॉर्पोरेशनला ठेका रद्द करण्याची नोटीस  बजावण्यात येणार होती. परंतु १२ दिवस उलटूनही अद्यप कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याची नोटीस तयार आहे. परंतु, त्यात काही बदल करून लवकरच ती बजावण्यात येणार आहे. याशिवाय बसगाडय़ा सुरू करण्यासाठी बैठका घेण्यात येत आहेत.

– अजित मुठे, पालिका उपायुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:21 am

Web Title: transportation ontract canceled by mbmc zws 70
Next Stories
1 भिवंडीत इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू
2 यंत्रमाग कारखान्यांमुळे इमारतींना धोका?
3 शहापूरमध्ये २४ तारखेपासून आठवडाभर जनता कर्फ्यू
Just Now!
X