जयेश सामंत

वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णवाहिकांची कमतरता भासू लागल्याने परिवहन उपक्रमाच्या मिनी बसगाडय़ांचे रुग्णवाहिकेत रूपांतर करणाऱ्या ठाणे महापालिकेने रुग्ण वहनासाठी जिल्ह्य़ातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांच्या मिनी बसेस आणि व्हॅन अधिग्रहित करण्याची तयारी सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यामार्फत महापालिकेने परिवहन विभागाकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला असून विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाडय़ा तात्पुरत्या स्वरूपात मालकांच्या परवानगीने रुग्णवाहिकांमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या दीड हजारांपेक्षा अधिक झाली आहे. महापालिकेकडे सद्य:स्थितीत जेमतेम २० रुग्णवाहिका उपलब्ध असून ही संख्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. रुग्णवाहिका वेळेत मिळत नसल्यामुळे उपचारांअभावी काही रुग्णांना प्राण गमवावे लागल्याच्या तक्रारी असून महापालिका प्रशासनाला राजकीय रोषासही सामोरे जावे लागत आहे.

तयारी सुरू..

कमतरता भरून काढण्यासाठी टीएमटीच्या मिनी बसगाडय़ांचे रूपांतर रुग्णवाहिकांमध्ये केल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील आणि महापालिका हद्दीबाहेरील शाळेच्या मिनी बसेस, व्हॅन रुग्णवाहिकांसाठी अधिग्रहित करण्याची तयारी सुरू केली आहे.याशिवाय शहरातील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने महापालिकेस मिळाल्यास त्यांचा वापरही रुग्णवाहिकांसाठी केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर यांनी दिली.

बस चालकांचा रोजगार धोक्यात..

मुंबई : राज्यभरात शालेय बसच्या जवळपास दोन लाख चालक, मदतनीसांचा रोजगार धोक्यात आला आहे. बहुतेक शाळांनी या शैक्षणिक वर्षांसाठी बसची सुविधा न घेण्याचे ठरवले असून बस मालकांबरोबरील कंत्राटे रद्द केली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे शालेय वाहतूकदारांचा रोजगार धोक्यात आला आहे.