ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचताना दीड तासांची रखडपट्टी

एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असा निसर्गरम्य आणि शांततामय परिसर असलेल्या घोडबंदर भागात अनेकांनी घरे घेतली, मात्र येथील मुख्य व अंतर्गत मार्गावर होणाऱ्या कोंडीमुळे रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत आहे. या ठिकाणी घर खरेदी केल्याचा पश्चात्ताप होत असल्याचा सूर, घोडबंदरवासीयांत उमटू लागला आहे.

नवे ठाणे म्हणून परिचित असलेल्या घोडबंदर भागात अंतर्गत वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा एकमेव रस्ता आहे. तिथे अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. वाढत्या अवजड वाहनांसाठी आधीच हा रस्ता कमी पडू लागला आहे. मेट्रोच्या कामांसाठी मार्गरोधक लावण्यात आले आहेत. विविध वाहिन्यांच्या कामांसाठी सेवा रस्तेही खोदण्यात आले आहेत. महामार्गावर कोंडी होत असल्यामुळे अनेकजण बाळकुम, कोलशेत, ब्रह्मांड,  वाघबीळ मार्गे प्रवास करतात. मात्र, तिथेही खोदकाम केल्यामुळे कोंडी होत आहे. एमएमआरडीएच्या अधिकारी दिलीप कवटकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वाहतूक पोलिसांच्या सूचना

सर्व यंत्रणांना एकाच वेळी खोदकाम करण्यास वाहतूक शाखेकडून परवानगी दिली जाणार नाही. मेट्रोसाठी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवूनच टप्प्याटप्प्याने खोदकामे करावीत. प्रकल्पाचे काम करताना स्थानिक रहिवाशांना व वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची दक्षता द्यावी. एका दिवसात मेट्रोचे जेवढय़ा अंतराचे काम केले जाणार आहे, तेवढय़ाच अंतरात मार्गरोधक बसवावेत. दुरुस्तीसाठी खोदकाम करायचे असल्यास, तेवढय़ाच भागात खोदकामासाठी परवानगी दिली जाईल.

नागरिक काय म्हणतात?

* घोडबंदरमध्ये १८ वर्षांपूर्वी घर घेतले. आता पश्चात्ताप होत आहे. कोंडीमुळे ठाण्याच्या बाजारात जाणेही बंद केले आहे, असे प्रसाद चिटणीस यांनी सांगितले.

*  दोन वर्षांपूर्वी घोडबंदरहून ठाणे स्थानकात येण्यास २५ मिनिटे लागत. आता दीड ते दोन तास लागतात, अशी प्रतिक्रिया निकिता रावळ या विद्यार्थिनीने दिली.

*  ठाणे स्थानकातून विजयनगरीपर्यंतच्या प्रवासासाठी २५ मिनिटे लागत. कोंडीमुळे एक ते दीड तास लागतो. याचा परिणाम कामावरही होऊ लागला आहे, अशी प्रतिक्रीया उमेश बुगदाणी यांनी दिली.

*  ठाणे स्थानकापासून घरी येण्यासाठी किमान पाऊण तास लागतो. वसंत विहार, हिरानंदानी मेडोज या परिसरात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा पार्किंग केले जाते. त्यामुळे कोंडी होते, असे अर्चना देसाई यांनी सांगितले.