News Flash

‘केडीएमटी’ बंदमुळे कल्याण-नवी मुंबईचा प्रवास त्रासाचा

‘एनएमएमटी’वर प्रवाशांचा भार

एनएमएमटीच्या बसमध्ये प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात.

‘एनएमएमटी’वर प्रवाशांचा भार

कल्याण : टाळेबंदीत मोठय़ा प्रमाणावर शिथिलता आल्यानंतरही कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने नवी मुंबईतील वाशी, कोकणभवन, बेलापूरच्या दिशेने बससेवा अजूनही बंद ठेवल्याने या मार्गावर दररोज मोठय़ा संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या त्रासाने आता टोक गाठले आहे. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामार्फत या मार्गावरील बससेवा सुरू आहे. या बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची दररोज मोठी झुंबड उडते. प्रवाशांचा हा भार इतका मोठा आहे की एनएमएमटीची या मार्गावरील बससेवाही अपुरी ठरू लागली आहे.

कल्याण, डोंबिवली परिसरातून दररोज मोठय़ा संख्येने प्रवासी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करत असतात. केडीएमटी आणि एनएमएमटी प्रशासनाच्या अहवालानुसार हा आकडा दररोज किमान सव्वा ते दीड लाखाच्या घरात आहे. टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यानंतर बहुतांशी खासगी, सरकारी कार्यालये सुरू झाली आहेत. नवी मुंबईत कोकण भवन परिसरात शासकीय कार्यालये असून येथेही कर्मचाऱ्यांना उपस्थिती आता बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतून नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी मुभा नसल्याने हे कर्मचारी एस. टी., केडीएमटी, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसवर अवलंबून आहेत. केडीएमटीने कल्याण-डोंबिवली शहरात बससेवा सुरू ठेवली आहे. मात्र बाहेरच्या शहरांमध्ये अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी बससेवा वगळून प्रवासी सेवा दिली जात नाही. नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाने मात्र टाळेबंदीत शिथिलता मिळताच पूर्ण भराने बससेवा सुरू केली आहे.

 

नोकरदार हवालदिल

कल्याण- डोंबिवलीमधील नोकरदार प्रामुख्याने नवी मुंबई, वाशी, बाजार समिती, तुर्भे, महापे, सीबीडी बेलापूर, कोकणभवन परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त जातात. हे सगळे प्रवासी कल्याण- डोंबिवली पालिकेचे करदाते आहेत. त्यांचे प्रवासात होणारे हाल विचारात घेऊन केडीएमटीने तात्काळ कल्याणहून नवी मुंबईकडे बस सोडणे आवश्यक आहे. कडोंमपा हद्दीतील प्रवाशांची वाहतूक करण्याची प्रामुख्याने जबाबदारी ‘केडीएमटी’ची असताना तो भार ‘एनएमएमटी’ वाहत आहे. नवी मुंबईच्या रहिवाशांनी आपल्या परिवहन सेवेसाठी करभरणा करायचा आणि सेवा मात्र कल्याण-डोंबिवलीतील लोकांनी घ्यायची असा प्रकार सध्या सुरू आहे, अशी खंत ‘एनएमएनटी’च्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

केडीएमटीने भिवंडी, मलंगगड भागात बस सोडण्याचे नियोजन केले आहे. दोन दिवसांत या बस सुरू होतील. टप्प्याने नवी मुंबईतील प्रस्तावित ठिकाणी बस सोडण्याचे नियोजन आहे. प्रवाशांची या मार्गावर बस सोडण्याची मागणी होत आहे. त्याचा प्राधान्याने विचार केला जात आहे.

– मिलिंद धाट, परिवहन व्यवस्थापक, केडीएमटी

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 3:12 am

Web Title: travel from kalyan to navi mumbai is harassing due to closure of kdmt zws 70
Next Stories
1 प्रकल्पबाधितांना विनामूल्य निवारा
2 भिवंडीतील सरकारी रुग्णालयाला करोनामुळे बळ
3 मालमत्ता करवसुलीवर भर
Just Now!
X