दोन धोकादायक पादचारी पूल पाडण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय; उर्वरित पुलांवर भार वाढणार

ठाणे रेल्वे स्थानकातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे दोन पादचारी पूल धोकादायक झाल्याने ते पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, हे दोन्ही पूल बंद झाल्यानंतर ठाणे स्थानकातील प्रवाशांचा भार उर्वरित पादचारी पुलांवर वाढणार आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सात लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. स्थानकात रेल्वे प्रवाशांसाठी पाच पादचारी पूल आहेत. तर शहराला पूर्व आणि पश्चिेमला जोडण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंबई आणि कल्याण दिशेकडे दोन पादचारी पूल उभारले आहेत. मात्र, सुमारे ४४ वर्षे जुने झालेले हे पूल धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिल्याने ते पूल पाडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात लवकरच रेल्वेच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहेत. हे पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे समजते.

कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेला असणाऱ्या एका पादचारी पुलाचे काम नऊ महिन्यांपासून रखडले आहे. त्यातच महापालिकेचे दोन पूल बंद झाल्यावर उर्वरित पुलांवर मोठी गर्दी होणार आहे. ‘स्थानकातील कल्याण दिशेकडे असलेल्या पादचारी पुलाचे काम रखडले असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे. त्यातच हे दोन पूल बंद झाल्याने इतर पुलांवर गर्दी वाढणार असून रेल्वेने इतर या तीनही पुलांची कामे युद्धपातळीवर करायला हवीत,’ असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.

 

‘ओव्हरहेड’ तार तुटल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

ठाणे : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील टिटवाळा आणि आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. हजारो प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला.

टिटवाळा आणि आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी ११.४७ मिनिटांनी ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी एकही रेल्वेगाडी आंबिवली रेल्वे स्थानकाच्या पुढे गेली नाही. त्याचा परिणाम कसारा मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर बसला. कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने आणि मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली होती. याचा परिणाम टिटवाळा आणि त्यापुढील रेल्वे स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या भागातून ठाणे, मुंबई, नवी मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, लोकलगाडय़ा नसल्याने हजारो प्रवाशांना ताटकळत रेल्वे स्थानकात थांबावे लागले होते. दुपारी उशिरापर्यंत या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे अनेक प्रवाशांनी खासगी वाहनाने कल्याण आणि शहाड स्थानक गाठून प्रवास केला.