करोनाकाळात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर अनेकांनी मूळ गावी जाण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांना या प्रवासासाठी आता तिप्पट पैसे मोजावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक चणचण भासत असल्याने ते गावी जाण्यासाठी निघाले असून खासगी टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या कंपन्यांनी त्यांच्याकडून तिप्पट दराने भाडे आकारणी सुरू केली आहे. यामुळे ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईहून गावी निघालेल्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे चित्र आहे.

राज्यात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने २२ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. सर्वच जिल्ह्यांतील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल करत अनेक सवलती देऊ केल्या आहेत. त्यात नागरिकांना जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी अद्याप रेल्वे वाहतूक आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी खासगी टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या मिनी बस आणि चारचाकी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार बंद झाला असून काहीजणांच्या नोक ऱ्याही गेल्या आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अनेकांनी गावी जाण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गावापर्यंतचा प्रवासही त्यांच्यासाठी महागडा ठरू लागला आहे. खासगी चालक प्रवाशांकडून तिप्पट भाडे आकारणी केली जात असल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी ठाण्याहून कोकणात जाण्यासाठी ५०० ते ७०० रुपये दर आकारला जात होता. मात्र, याच प्रवासासाठी आता दोन हजार ते अडीच हजार रुपये आकारले जात आहेत. तर, ठाण्याहून कोल्हापूर, सोलापूर आणि सांगलीला जाण्यासाठी ५०० ते ७०० रुपये आकारले जात होते. सध्या याच प्रवासासाठी दीड हजार ते दोन हजार रुपये आकारले जात आहेत. वाहतुकीच्या तिप्पट दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच एका खासगी चारचाकी वाहनात केवळ दोन प्रवाशांना परवानगी असताना हे चालक एका वेळी तीन ते चार प्रवाशांना गावी घेऊन जात आहेत. त्यामुळे अंतरसोवळ्याच्या निर्णयाला हरताळ फासला जात असून हा सर्व प्रवास रात्रीच्या वेळी करण्यात येत आहे. त्यामुळे करोना संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दलालांमार्फत प्रवासाचे आणि गाडीचे नियोजन

ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतून गावी जाणारे प्रवासी खासगी वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या दलालांसोबत संपर्क साधतात. प्रवाशांची संख्या आणि प्रवासाचे ठिकाण याप्रमाणे दलाल खासगी मिनी बस चालक आणि चारचाकी चालकांशी संपर्क साधतो. त्यानंतर दलाल प्रवाशांना जाण्याचा दिवस, वाहनाचे ठिकाण आणि वेळेची माहिती देतो. अशा प्रकारे प्रवाशांच्या वाहतूकीचे नियोजन केले जात आहे.