आयुक्तांच्या मनाईनंतरही पोखरण-१च्या रस्त्यावरील झाडांची तोड
ठाणे शहरात यापुढे हिरवाईचे जतन केले जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून दिले जात असले तरी पोखरण-१ मार्गावर वृक्षांची अजूनही अमानुषपणे कत्तल केली जात असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पोखरण रस्ता क्रमांक-२ च्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची कत्तल केली जाणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी यापूर्वीच घेतली आहे. असे असताना रस्ता क्रमांक-१मधील झाडांना हा न्याय का लावता येत नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या मार्गावरील वृक्षांच्या पुनरेपणाची प्रक्रियाही यापूर्वीच वादात सापडली आहे.
या रस्त्याच्या रुंदीकरणातून वाचू शकणारी झाडेही भुईसपाट केली जात असल्याचा आरोप काही स्थानिक रहिवाशांनी केला आहे. ठाणे महापालिकेच्या कथनी आणि करणीत कमालीची तफावत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या मार्गावरील झाडांचे पुनरेपण केले जात असल्याचा दावा महापालिकेमार्फत केला जात असला तरी या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी पुढे येत असून हे पुनरेपण म्हणजे केवळ दिखावा असल्याचा आरोप शहरातील सामाजिक संस्थांनी सुरू केले आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांना याविषयी माहिती घेऊन हा प्रकार तात्काळ थांबवण्याची विनंती ‘ठाणे सिटिझन व्हाइस’ या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
ठाण्यातील रस्ता रुंदीकरणाची कारवाई गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंद होऊ लागले आहेत. या रुंदीकरणाचा फटका शहरातील हिरवळीला बसला असून वृक्षराजीने नटलेले रस्ते उघडे बोडके भासू लागले आहेत. याविषयी ठाण्यातील सामाजिक संस्था, जागृत नागरिकांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली. या पाश्र्वभूमीवर आयुक्त जयस्वाल यांनी शहरातील कोणत्याही झाडाच्या मुळावर घाव घालणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, पोखरण रस्ता क्रमांक-१ वर वृक्षांची बेसुमार कत्तल सुरूच असल्याचे पाहून या भागातील रहिवासी अस्वस्थ झाले आहेत. ठाण्यातील वर्तकनगर परिसरामध्ये रस्त्यापासून काही अंतर लांब असलेले झाडही तोडण्यात आल्याने रहिवशांचा संताप अनावर झाला आहे. पोखरण रस्ता क्रमांक-२ वरील झाडांना जीवदान देत असताना एक वरील झाडांची मात्र धूळधाण उडवण्यात येत आहे. महाराष्ट्र गो ग्रीन फाऊंडेशन आणि ‘ठाणे सिटिझन व्हाइस’ संस्थेच्या वतीने या प्रकरणी आयुक्तांकडे दाद मागण्यात आली आहे.

पुनरेपणाचा केवळ देखावा..
पोखरण रस्ता क्रमांक-१वरील झाडांचे पुनरेपण करण्यात येते, असा महापालिकेचा दावा असला तरी हा दावा पूर्णपणे फोल असून या पुनरेपण प्रक्रियेमध्ये मोठय़ा प्रमाणात वृक्षांचा जीव जात आहे. झाडे मुळासकट उपटताना आजूबाजूची जागा भुसभुशीत करण्याची गरज असते. यामुळे पदपथ खराब होतील, अशी भीती काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे झाडांना जेसीबी मशीनचे धक्के मारून ती पाडली जात आहेत. हे अत्यंत अशास्त्रीय असून त्यामुळे झाडाची मुळे तुटून त्यांचा मृत्यू होत आहेत, अशा तक्रारी आहेत. विहंग विहार कॉम्प्लेक्स परिसरात अशाच अशास्त्रीय पद्धतीने झाडांचे पुनरेपण केले जात असल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.