कललेल्या झाडांना डेब्रिजचा टेकू; गावदेवीमध्ये झाड कोलमडून घराचे मोठे नुकसान

ठाणे शहरात बडय़ा बिल्डरांच्या प्रकल्पांसाठी शेकडो वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात असतानाच महापालिकेमार्फत करण्यात येणारी रस्ते काँक्रीटीकरणाची कामेही आता जुन्या वृक्षांच्या मुळावर आल्याचे चित्र दिसू लागले आहे. नौपाडा तसेच आसपासच्या परिसरात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू असून याच भागात असलेल्या गावदेवी येथील बेडकर रुग्णालय परिसरात ठेकेदारामार्फत करण्यात येत असलेल्या खोदकामांमुळे झाडांची मुळे खिळखिळी होत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमींकडून पुढे आल्या आहेत. यापैकी एक झाड काही दिवसांपूर्वी लगतच असलेल्या एका घरावर कोसळल्याने उर्वरित वृक्ष तग धरून राहावी यासाठी महापालिकेने चक्क या मुळांभोवती राडारोडा आणून टेकू दिला आहे. एरवी हरित ठाण्याच्या घोषणा करणाऱ्या महापालिकेच्या ठेकेदाराचा हा उपद्वाप पाहून नौपाडावासीय मात्र चक्रावून गेले आहेत.

ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणावर रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू असून याच काळात बिल्डरांच्या मोठय़ा प्रकल्पांना बांधीव विकास हस्तांतर हक्काद्वारे वाढीव चटईक्षेत्राचा पर्याय खुला करून दिला जात आहे. झपाटय़ाने होणाऱ्या या विकासामुळे ठाण्यातील राजकीय नेते आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी स्वत:ची पाठ थोपटवून घेण्यात मग्रुर दिसत असले, तरी विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांचे बळी दिले जात असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. वृक्ष प्राधिकरण समितीत बिल्डरांच्या विकास प्रकल्पांसाठी वृक्षांच्या कत्तलीस मनमानेल त्या पद्धतीने मंजुरी दिली जात असल्याने शहरातील काही पर्यावरणप्रेमींनी यापूर्वीच न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश मिळवला आहे. नौपाडा भागात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांसाठी मध्यंतरी जुन्या, पुरातन वृक्षांवर ठेकेदाराने कुऱ्हाड चालवली. या पाश्र्वभूमीवर नौपाडय़ातील रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामात वृक्षांची मुळे खिळखीळी करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने महापालिका प्रशासनावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे.

या संदर्भात या प्रभागाचे नगरसेवक सुनेश जोशी यांना विचारणा केली असता, झालेला प्रकार अत्यंत वाईट आहे. यासंबधी पालिकेच्या वृक्ष विभागाला कळवण्यात आले असून झाडांना नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले.

राडारोडय़ाचा आधार

झाडांच्या भोवती असलेली माती सैल झाल्याने मुळांना कसलाच आधार राहत नाही. त्यामुळे ही वृक्ष कोलमडून पडण्याचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. मध्यंतरी ठाणे शहरात असे प्रकार सातत्याने घडत असल्याने वृक्ष प्राधिकरण विभागाने मुळांभोवती माती घट्ट बसावी यासाठी घेर उभारण्याचा निर्णय घेतला होता. नौपाडय़ात मात्र काँक्रिट रस्त्यांसाठी खोदकाम करताना वृक्षांच्या मुळांचा कसलाच विचार केला जात नसल्याचे चित्र पर्यावरणप्रेमींना अस्वस्थ करू लागले आहे. यासंबंधी स्थानिक रहिवाशांना महापालिका आणि पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, प्रशासकीय यंत्रणांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. उलट सैल झालेल्या मूळांवर  डेंब्रिज ओतुन ती घट्ट करण्याची अजब शक्कल येथील कंत्राटदाराने लढवली आहे. एवढेच नव्हे तर मूळे सैल झाल्याने झुकलेल्या झाडांना ताठ ठेवण्यासाठी लाकडाचा टेकूही लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बेडेकर हॉस्पिटलसमोरील एका बंगल्यावर बदामाचे झाड कोसळल्याने तेथील बांधकामाचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई पालिकेने करावी यासाठी घरमालकाचे म्हणणे आहे.

वृक्षांना गृहीत धरू नका!

रस्ता रुंदीकरण, गटारे बांधणे, सुशोभीकरण करणे अशा विकासकामांमध्ये येणाऱ्या झाडांवर नेहमीच कुऱ्हाड चालवल्याचे प्रकार घडतात. ही झाडे वाढण्यासाठी अनेक वर्षे लागतात. विकासाच्या नावाने अगदी सहजपणे कोणताही पर्वा न करता झाडे तोडणे, विषप्रयोग करणे, छाटणे, जाळणे असे अमानुष प्रकार दिवासागणिक वाढत असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.