पालिकेने कुऱ्हाड चालविल्यानंतरही बुंध्याला हिरवा कोंब

महापालिका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जीर्ण आणि धोकादायक असल्याचा ठपका ठेवून मंगळवारी अतिशय तातडीने तोडून टाकलेल्या नौपाडा पोलीस ठाण्यासमोरील वृक्षाच्या उरल्यासुरल्या अवशेषास चक्क नवी पालवी फुटली आहे. त्याला जमीनदोस्त करण्यात प्रशासनाने खूपच घाई केल्याचा हा ठळक पुरावा असल्याचे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे.

जुने ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाडा परिसरातील अनेक वृक्षांमुळे या परिसरातील निसर्गसौंदर्य आणि पर्यावरण टिकून आहे. मात्र व्यापारीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे येथील झाडांवर गंडांतर येऊ लागले आहे. महात्मा गांधी पथावर सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या आड येणारी अनेक झाडे तोडण्यात आली. काही झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. त्यामुळे या रस्त्यावरील घनगर्द सावली आता विरळ झाली असून हा परिसर ओकाबोका आणि रूक्ष वाटू लागला आहे. पुलाच्या आड न येणारे काही वृक्ष तरी वाचतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यासमोरील पर्जन्यवृक्ष अत्यंत तातडीने तोडून टाकल्याने ती आशाही फोल ठरली आहे. अतिशय निर्दयपणे या झाडावर कुऱ्हाड चालवूनही उरलेल्या बुंध्याला अवघ्या दोन दिवसांत पालवी फुटली आहे. त्यामुळे हे झाड पुन्हा तग धरून वाढेल, अशी आशा काही नागरिकांनी व्यक्त केली.

शिल्लक राहिलेल्या बुंध्याला अवघ्या दोन-तीन दिवसांत फुटलेली पालवी म्हणजे तोडण्यापूर्वी झाड जिवंत होते, याचा पुरावा आहे. नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरणारी, जीर्ण झालेली झाडे काही प्रमाणांत छाटणे अथवा तोडून टाकणे अनिवार्य आहे. मात्र तशी कोणतीही खात्री न करता सर्रास झाडांवर कुऱ्हाड चालविणे निषेधार्ह आहे.

रोहित जोशी, पर्यावरणप्रेमी, ठाणे