माजिवडे-वडपे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी; बाधित होणाऱ्या ९७३ वृक्षांचे पुनरेपण

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी या मार्गात अडथळा ठरणारे ५१७ वृक्ष तोडण्यास ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने शुक्रवारी परवानगी दिली. या कामात बाधित होणाऱ्या उर्वरित ९७३ झाडांचे पुनरेपण करण्याच्या सूचनाही समितीने पाहणी दौऱ्यानंतर दिल्या. या निर्णयामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वृक्षकत्तल होणार असल्याने पर्यावरणप्रेमींकडून त्याला विरोध होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शहरातील विविध विकासकांच्या बांधकामांमध्ये अडसर ठरणाऱ्या २४७ वृक्षांना तोडण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यापैकी १६३ वृक्ष न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच तोडण्याची अट समितीने घातली होती. याच बैठकीच्या पटलावर मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या ९७३ वृक्षांचे पुनरेपण तर ५१७ वृक्ष तोडण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या अर्जानुसार हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव समितीने रोखून धरला होता. तसेच या भागाची पाहणी केल्यानंतरच परवानगी देण्याचा निर्णय समिती सदस्यांनी घेतला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य विक्रांत तावडे, नम्रता भोसले, अशरीन राऊत, संगीता पालेकर, वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या सर्वानी परिसराचा संयुक्त पाहणी दौरा केला. अडीच तासांच्या पाहणी दौऱ्यानंतर समिती सदस्यांनी अखेर रस्त्याच्या कामात अडसर ठरणारे ५१७ वृक्ष तोडण्यास मान्यता दिली. त्याचबरोबर या कामात बाधित होणाऱ्या उर्वरित ९७३ वृक्षांचे पुनरेपण करण्याचा निर्णयही या वेळी घेतला, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

मुंबई-नाशिक महामार्गावरून भिवंडी, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. सद्य:स्थितीत हा महामार्ग चार पदरी असून तो आता आठ पदरी केला जाणार आहे. झाडे तोडण्याच्या प्रस्तावास वृक्ष प्राधिकरण विभागाकडून परवानगी मिळाल्याने या रस्ता रुंदीकरण कामातील मोठा अडसर दूर झाला आहे.

सुबाभळीची झाडे जास्त

माजिवडा ते वडपे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ५०७ सुबाभूळ, ३ आंबा, ६ निलगिरी आणि एक साग असे एकूण ५१७ वृक्ष तोडले जाणार आहेत. तर ४ आकाशी, २ एैन, ६ अशोक, ७ बाभूळ, ८ बादाम, एक बेल, ६५ बोर, १ बॉटल पाम, ४ चाफा, ११४ विलायती चिंच, ५ धामण, ५३ केशिया, २६ गुलमोहर, ५ हळद, ११ जांभूळ, ८३ जंगली, २० कदंब, ७५ करंज, १० नारळ, ६ नीम, १३६ पापडी, २०९ पेल्टोफोरम, ४५ पिंपळ, १६ रेन्ट्री, १७ सावर, १२ शेवगा, २ सिसम, २६ उंबर, ४ वड अशा एकूण १४९० वृक्षांचे पुनरेपण केले जाणार आहे.