News Flash

जन्म, मृत्यू, विवाह झाल्यास एक झाड लावणे बंधनकारक

महापालिकेची झाड दत्तक योजना सुरू, १८०० जणांची यादी तयार

महापालिकेची झाड दत्तक योजना सुरू, १८०० जणांची यादी तयार

शहरात अधिकाधिक वृक्ष लागवडीसाठी वसई-विरार महापालिकने पुण्याच्या धर्तीवर वृक्ष दत्तक मोहीम सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत घरात कुणाचा जन्म झाला, विवाह झाला तर आनंदी वृक्ष, मृत्यू झाल्यास स्मृती वृक्ष लावावा लागणार आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात १८०० जणांची यादी तयार केली आहे.

राज्य शासनाने सामाजिक वनीकरणाला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार महापालिकेनेही शहरात वृक्ष लागवड करण्यावर भर दिला आहे. याचाच भाग म्हणून महापालिकेने आता वृक्षदत्तक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जन्म-मृत्यू झाल्यास तसेच विवाह झाल्यास एक वृक्ष दत्तक घेऊन त्याची जोपासना करावी लागणार आहे. याची माहिती देताना प्रभारी साहाय्यक आयुक्त (वने) सुरेंद्र पाटील यांनी सांगितले की, अपत्याचा जन्म होणे ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे जन्म झाल्यास पालकांनी एक झाड लावायचे, तसेच मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ स्मृतिवृक्ष लावायचा आहे. लग्न झालेल्या जोडप्यांनीही विवाह झाल्याच्या निमित्ताने आनंदी झाड लावायचे आहे. पालिकेकडे शहरातील जन्म-मृत्यू झाल्याची तसेच विवाह झाल्याच्या नोंदी असतात. त्यानुसार अशा लोकांची यादी बनवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेने ९ प्रभागांतील जन्म-मृत्यू आणि विवाह झालेल्या कुटुंबीयांची यादी बनवली आहे. पालिकेचे कर्मचारी या कुटुंबांशी संपर्क साधणार आहे. झाड लावताना हमीपत्र घेण्यात येणार आहे. हे झाड जगल्यास संबंधित व्यक्तीला पालिकेकडून प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. पालिकेने १८०० जणांची यादी बनवली आहे. प्रत्येक प्रभागातील ५० ते १०० जण पहिल्या टप्प्यात निवडण्यात आले आहे. मे आणि जून महिन्यात जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी झालेले निवडण्यात आले आहेत. हा उपक्रम वर्षभर सुरू राहणार आहे.

ज्यांना झाडे लावायला जागेची अडचण असेल त्यांना पालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. झाडांचे संगोपन त्या व्यक्तीने करायचे आहे. नागरिकांनी झाडे लावणे हे लादलेले काम न समजता आनंदाने सामाजिक उपक्रम म्हणून स्वीकारावे, असे पालिकेने सांगितले आहे. आपल्या आनंदाची आठवण किंवा प्रियजनांची आठवण म्हणून लावलेली झाडे आनंदच देतील, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:21 am

Web Title: tree plantation 4
Next Stories
1 वसई-विरार शहरात एचआयव्हीचे ७२ रुग्ण
2 श्रीकांत शिंदे यांच्यावर गुन्हा का नाही?
3 कल्याण-भिवंडी मेट्रोला प्राधान्य
Just Now!
X