|| सुहास बिऱ्हाडे

महापालिकेकडून एक महिन्यात ७० हजार झाडांची लागवड; ४ कोटींचा खर्च

वसई-विरार शहरात मानवनिर्मित जंगल निर्माण करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात महापालिका एकाच महिन्यात तब्बल ७० हजार झाडांची लागवड करणार आहे. यासाठी सुमारे ४ कोटी रुपये खर्च येणार आहे. १ जुलैपासून ही मोहीम सुरू होणार आहे.

वसई-विरार महापालिकेने शहरात कृत्रिम जंगल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागाच्या माध्यमातातून पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वनीकरण करून हे जंगल विकसित केले जाणार आहे. मागील वर्षी शिरगाव, गास कोपरी आणि नारिंगी येथे ५० हेक्टर जागेवर ५५ हजार ५५० झाडे लावण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील जंगल तयार केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे वनीकरण जुलै महिन्यात केले जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी ९१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड या संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने वनीकरण करण्यात येणार आहे. एकूण २०० हेक्टर जागेवर हे जंगल तयार केले जाणार आहे. विरारमधील शिरगाव, गास, कोपरी नारिंगी, चंदनसार, कणेर, विरार, नालासोपारा येथील बिलालपाडा, धानीव, पेल्हार या ठिकाणच्या २०० हेक्टर जागेवर हे जंगल विकसित केले जाणार आहे.

२०१७च्या पावसाळ्यात पहिल्या टप्प्यात शिरगाव, गास कोपरी आणि नारिंगी येथील ५० हेक्टर जागेवर ५५ हजार झाडे लावून जंगल तयार झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात १ जुलै ते ३१ जुलै या एका महिन्यात शिरगाव येथील ६० हेक्टर क्षेत्रापैकी ५४ हेक्टर जागेवर ६० हजार आणि निर्मळ, तसेच शिरगाव तलाव परिसरात १० हजार झाडे लावली जाणार आहेत. या वनजमिनीवर प्रति हेक्टर ११११ प्रमाणे एकूण ७० हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात शिरगाव कुंभारपाडा ४९.५३ हेक्टर, खंदरपाडा १३.९६ हेक्टर, कक्ष क्रमांक  ११३१ वर ५.२५ हेक्टर या अवनत वनक्षेत्रावर २०१८चे तीन वर्षांसाठी वनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी ६२ लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्रभारी साहाय्यक आयुक्त (वने) सुरेंद्र पाटील यांनी दिली.

यासाठी पालिकेने वनविभागाशी करार केला आहे. पाच वर्षांत ही वृक्षलागवड केली जाणार असून सात वर्षे वनविभागामार्फत वृक्षांची देखभाल केली जाणार आहे. वनविभागाच्या भूखंडाव्यतिरिक्त जे इतर वनविभागाचे भूखंड महापालिकेच्या हद्दीत येत आहेत त्याच्या मंजूर विकास आराखडा (डीपी) नकाशानुसार रेखांकन करून वनीकरण करण्यात येणार आहे.

२८ हजार ठिकाणांचा शोध

वनीकरणाचा ही मोहीम शहरातही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने शहरात २८ हजार ठिकाणे शोधली आहेत. या ठिकाणी वृक्षारोपण करता येणार आहे. महिला बचतगटांनीही १० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यांना झाडे लावायची असतील, त्यांनी पालिकेत संपर्क केल्यास या स्थळांची त्यांना माहिती मिळेल आणि त्यांना वृक्षारोपण करता येणार आहे.

या ठिकाणी पर्यटनस्थळ, फॉरेस्ट पार्क, पक्षी अधिवास, हरीण पार्क, औषधी वनस्पती उद्याने विकसित केले जाणार आहेत. पुरावे मागितले पहिल्या टप्प्यात लावण्यात आलेल्या ५५ हजार ५०० झाडांपैकी ८२ टक्के झाडे जगली आहेत. या कामाचा एकूण खर्च २ कोटी ९४ लाख रुपये होता. त्यापैकी १ कोटी ७५ लाख रुपये देण्यात आले आहेत, तर उर्वरित रक्कम देण्यासाठी पुरावे मागण्यात आले आहे. यासाठी वनीकरण केल्याचे चित्रीकरण, जीओ टॅगिंग आदींचा समावेश आहे.

ही झाडे लावणार

बांबू, वड, आंबा, पिंपळ, काजू, विलायती चिंच, खैर, बेल, गुलमोहर, सीताफळ, सावर, रिठा, कडुलिंब, करंज. मोहा, जांभूळ, सप्तपर्णी, बकुळ, चिंच, कदंब, मोहगणी, आपटा